लग्नाशिवाय मुलासाठी भाडोत्री आई Surrogate Mother For Kid
नुकतीच देवकीनं वयाची पस्तीशी ओलांडली होती. लहान भाऊ बहिणीचं लग्न , माय बापाचं आजारपण, सात माणसांच्या परीवाराचं रोजचं खाणं पिणं सगळी जबाबदारी तिच्यावरच असल्यामुळे तिनं अजून लग्न केलं नव्हतं. का कुणास ठाऊक शरीरानं ती एकदम कृष झाली होती. दोन्ही भाऊ आपापल्या बायका घेऊन लग्न होताच वेगळे झाले होते जणू देवकीशी त्यांचा काही संबंधच नव्हता. दोन्ही बहिणी ही आपल्या विश्वात अशा रमल्या की आपल्याला कुणी मोठी बहीण आहे, याची त्यांना जाणच राहिली नव्हती. आई आणि बाबांनी एकाच दिवशी डोळे मिटल्याने ती एकाकी झाली होती. गावातल्या छोट्याश्या घरात तिचं वास्तव्य होतं. दोन्ही भाऊ सासरच्या पैशावर गावात माढी बांधून राहत होते. पण बहिणीकडे बघायला त्यांना वेळ नव्हता. ती मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होती. का कुणास ठाऊक भावांना कुठून तिचा पुळका आला, त्यांनी तिच्या साठी एक बीजवर शोधून आणला होता.
कुठवर बिनलग्नाचं राहायचं म्हणून देवकीनं लग्न झालेलं नसतांना ही त्याला सहज वरला होता. देवकी सासरी गेली पण जास्त दिवस टिकू शकली नव्हती. अवघ्या दोन वर्षातच सासरच्या मंडळीने तिला तिच्या भावाकडे आणून सोडली होती. कारण काय तर तिला मुल बाळ होणं शक्य नव्हतं. त्यांनी तिची तपासणी केली तर देवकीला गर्भाशयाच नाही हे डॉक्टरी निदानात स्पष्ट झाले होते. सासूने पुऱ्या गावात आकांत तांडव केले पहिली वांझ तर वांझ दुसरी पण माझ्या मुलाच्या नशिबात वांझोटीच यावी का रे देवा !
यशोदेच्या अंतकरणाचा जळून जळून कोळसा झाला . काय वाढून ठेवलंय माझ्या नशिबात विठ्ठला ! म्हणून ती काही नबोलता गप गुमान माहेरी आली. इथं आता तिचं घरही उरलं नव्हते. आणि भावजयाही हाणून पाडून बोलू लागल्या होत्या. भावांनी घराच्या लालसेनेच तिला बीजवरच्या गळ्यात बांधली होती. तिचं लग्न होताच ते घर विकून तर मोकळे झाले होते. भावजयांनी वांझोटी वांझोटी म्हणून हिणवत चार आठ दिवसातच तिला घराबाहेर केली.
आता ती एक छोटीशी झोपडी बांधून गावाच्या एका कोपऱ्यात राहू लागली . जमेल ते काम करायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा हे काम तिनं परत सुरू केलं. लग्नाअगोदर ही असंच होतं. पण आता तिच्यावर वांझोटीच एक नवं लेबल लावलं गेलं होतं . देवकीचा त्याग काय होता आणि कसा होता कुणालाच माहीत नव्हता. तिच्या त्यागाची कहाणी तिच्या आई वडिलांच्या चितेसोबत जळून खाक झाली होती.
आता देवकी वांझोटी या नावानेच ओळखली जाऊ लागली होती. सुरवातीला विरोध करू पाहिला, पण मग काम मिळणार नाही या धास्तीनं ती गप्प बसायची. देवकीला आता गावातील लहान सहान पोरं पण त्याच नावाने हाक मारायचे. प्रत्येक हाक तिच्या काळजावर घणाघाती प्रहार करायची, हे तिच्या चेहऱ्यावरून सहज लक्षात यायचं. तिला या गोष्टीचा इतका त्रास का होत असावा हा प्रश्न मला नेहमीच पडायचा पण तिला विचारायचं धाडस कधी झालंच नाही. मी मात्र तिला नेहमी देवका आक्काच म्हणायचो.
शेतावर काही काम असलं की ती यायची आमच्या घरी आई काळजीनं तिची विचारपूस करायची पण आज्जी आईवर डाफरायची, का त्या वांझोटीला जास्त लाडावते गं म्हणून ओरडायची. मग आई जमेल ती मदत करून तिला मागच्या दाराने लवकर घालवून द्यायची. आई म्हणायची देवका अंग तू पूर्वी जशी शहरात जाऊन नोकरी करायची ना या भावा बहिणी सारखी तशी आता पण जा आणि स्वतःच आयुष्य जग बाई ! पूर्वी तू सात आठ महिने बाहेर रहायची शहरात बऱ्यापैकी काम करीत चिक्कार पैसा कमवायची तेच बरं होतं. आणि त्यातूनच तर तू या चारही पोरांचं लग्न केलं ना? मायबाबाची जीवनभर सेवा केलीस. मग असंच एकदा जग स्वतः साठी…. आई तिच्या भल्या साठी बोलायची पण का कुणास ठाऊक तिचे डोळे डबडब भरून यायचे. आणि ती न बोलताच तिथून निघून जायची .
मी अभ्यास करतांना त्यांचा हा प्रकार बघायचो पण समजायचो मात्र काहीच नाही. आता तिच्या नशिबी हेच असावं म्हणून मी ही गप्प बसायचो. मनात असून ही तिच्या भावांना काही बोलता येत नव्हतं. दिवस मागून दिवस जात होते मी CA करून एका बलाढ्य व्यापाऱ्याकडे नोकरी पत्करली होती. त्यांचे सारे व्यवहार मीच पाहत असल्याने त्यांच्यात आणि माझ्यात इतर कामगारांपेक्षा जास्त जवळीक होती. आमच्या मालकाचा एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता. दिसायला खूप सुंदर, तो ही शाळेतून आला म्हणजे माझ्या जवळच असायचा. आई विना पोर मला मामा मामा म्हणून बोलायचा. मला ही तो खूप आवडायचा. मी एकदा मालकांना विचारलं होतं, साहेब प्रश्न खाजगी आहे पण रहावत नाही म्हणून विचारतो बाईसाहेब कशा आणि कधी गेल्यात हो?
अरे झालीत तीन चार वर्ष ! त्यांनी संक्षिप्त उत्तर दिलं. मग तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं ? अरे सावत्र आई ती सावत्रच या लेकराच काय होणार या भीतीने नाही केलं लग्न …. आणि थोडं बोलून विषय क्लोज व्हायचा. माझ्या मनात बऱ्याचदा देवका आक्काचा विषय यायचा पण कुठे ती गावातली गरीब बाई आणि कुठे हे बडे शेठ म्हणून मी विचार झटकून कामाला लागायचो. एक दिवस मी कामावर गेल्या गेल्याच साहेबांनी मला सरळ घरीच बोलावलं, ते खूपच अस्वस्थ वाटत होते. त्यांचा मुलगा निरंतर रडत होता. मी विचारले काय झालं बाळ तो काहीच बोलला नाही. मी खूप लाडीगोडी केली पण काही फायदा झाला नाही. शेवटी मी साहेबांनाच विचारले, तर कळलं हा आज आई साठी हट्ट करतोय. काही करता समजत नाही, आता तूच सांग वैभवा अशी याच्यावर माया करावी अशी आई कुठून बरं मिळेल. साहेबांचं वय ४०-४५ च्या घरातलं त्यांना सहज मुलगी मिळाली असती पण प्रत्येकीचा डोळा त्यांच्या संपत्ती वरच राहिला असता. आणि त्यांना मुला साठी आई हवी होती. बायका तर ते कितीतरी करू शकले असते. आज मी चांगली वेळ साधली आणि देवका आक्काचा विषय त्यांना सांगितला. व ती तुमच्या बाळा साठी योग्य आई होऊ शकेल हे सांगितले. तर त्यावर ते म्हणाले देवका अजूनही अविवाहित आहे.
म्हणजे तुम्ही तिला ओळखता का? मी प्रश्न केला
त्यावर त्यांनी जे सांगितले त्यावर माझा विश्वासच बसेना
वैभव लग्नाला पाच वर्षे लोटली होती तरी घरात पाळणा हलत नव्हता. त्यामुळे तुझी मालकीण नेहमी दुःखी रहायची. नवस केले उपास तापास केले पण काही उपयोग झाला नव्हता. डॉक्टर ची ट्रीटमेंट घेतली तेव्हा कळलं की ती आई होऊच शकत नाही. त्या मुळे ती अधिकच खचली होती. बऱ्याच दा तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण वाचली शेवटी मी एक दत्तक पुत्र घ्यायचं ठरवलं पण तिला माझाच मुलगा हवा होता. आणि त्या साठी मला दुसरं लग्न करावे लागणार होते. पण तिला सवत मान्य नव्हती.
मी मित्रांजवळ माझी समाश्या मंडळी पण कुणालाच काही कळेना मला काय उत्तर द्यावं. पण एके दिवशी कुणालाही काही न सांगण्याच्या अटीवर एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली. ती म्हणजे भाडोत्री गर्भाशय (सरोगेट मदर) त्याच्या कडे ते ही उपलब्ध होतं. कारण त्याने स्वतः ही तो पर्याय वापरला होता. आणि त्याच्या आधी त्याच स्त्रीने चार मुलांना याच प्रकारे जन्म दिला होता. त्याच्या मोबदल्यात ती मोठी रक्कम वसूल करत होती. या मागे तिचा काय हेतू होता सांगता येत नव्हतं पण ती पैसे घेऊन कायमची निघून जायची ती पुन्हा परत न येण्यासाठी.
त्या मित्रा करवी मी त्या स्त्रीशी संपर्क केला पत्नीला हा प्रकार सांगितला तर ती सहज तयार झाली. आणि आम्ही तशी प्रक्रिया केली. पण आमचं नशीबच खोटं असावं तिला सातव्या महिन्यातच वेदना सुरू झाल्या . माझी पत्नी परत खचली डॉक्टरांनी सांगितले. हिच्या गर्भाशयात कॉम्प्लिकेशन आहे, हिचा गर्भ आताच काढून टाकावा लागेल किंवा डिलीव्हरी नंतर हिचं गर्भाशय तरच ही वाचेल अन्यथा नाही. आम्ही गर्भ काढण्याची परवानगी दिली. तिच्या सोबत झालेली डील तिथेच संपवून आम्ही घरी आलो कारण आम्हाला आई बाप होऊन कुणाचं आई पण देणारं गर्भाशय काढून घ्यायचं नव्हतं. तिला आम्ही भरपूर पैसा दिला होता तो ही परत देऊ नको असं सांगून निघून आलो होतो.
पण दोन महिन्यानंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही या आणि तुमचं बाळ लवकरच जन्म घेणार आहे त्याला घेऊन जा. सुरवातीला काय प्रकार आहे आम्हाला काहीच कळलं नाही पण हॉस्पिटलमध्ये मध्ये गेल्यावर दिसलं की तीच स्त्री प्रसव पीडा देत होती. डॉक्टरांच्या सल्ल्याला न मानता तिनं बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं. त्यामागे तिचा दुहेरी हेतू होता. पहिला आपल्या डील शी प्रामाणिक राहणे आणि दुसरा भ्रूण हत्या न होऊ देणे. आणि या हेतू मुळे तिनं आपलं गर्भाशय गमावलं होतं. आणि आम्हाला तिनं हे बाळ दिलं आणि चालती झाली.
पुढे आमची सौभाग्यवती पण चालती झाली. पुढे तिचं काय झालं मला माहित नव्हतं. श्रीमती गेली तेव्हा एक आई म्हणून तीच याच्या साठी आई म्हणून मला योग्य वाटत होती. तिचा शोधही घेतला पण तेव्हा कळलं होतं तिचं नुकतंच लग्न झालंय म्हणून मी तो विषय ही संपवून पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नाही तर तू सांगतोय ती देवकीच आहे.
माझ्या डोळ्यात भराभरा अश्रू गोळा झाले. ते आनंदाचे होते की दुःखाचे हे साहेबांना कळले नाही पण माझ्या साठी ते दोन्ही गोष्टींचे होते. दुःखाचे या साठी की ह्या स्त्रीने इतका त्याग करूनही हिला सदैव अवहेलनाच मिळाली. आणि सुखाचे या साठी की पाच मुलांना जन्म देणारी देवका आक्का वांझोटी नव्हतीच…..!
शिवा चौधरी
