अंबादेवीच्या यात्रेत लग्नाचा पोरगा फुकट
‘ए लग्नाचा पोरगा फुकट’ अशी ‘गिन्हाईकी’ टाइप आर्जव करणारा एक शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. अश्विन वाकोडे या स्थानिक कलाकाराने ‘फुकट आहे घेऊन जा लवकर’ या टॅगलाइनने तो दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अपलोड केला. येथील अंबादेवीच्या यात्रेतील त्या शॉर्ट व्हिडीओला अवघ्या दोन दिवसांत नऊ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. त्याला अमरावतीसह विदर्भातील अनेक नेटकरी शेअर, लाइक अन् फॉरवर्ड करत सुटले आहेत.
उपवर मुलांना सहजासहजी मुली भेटत नाहीत, या समस्येवर त्याने व्हिडीओतून केलेले मिश्किल भाष्य भन्नाट व्हायरल होऊ लागले आहे. लग्नासाठी पोरगी पाहून थकलेला एक तरुण नवरात्रीदरम्यान अंबादेवी रोडवर बसतो. जसा एखादी वस्तू विकतो, तशा टाइपने तो ‘लग्नाचा पोरगा फुकट’ असे म्हणत रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. स्वतःभोवती दुपट्ट्याने हवा मारत तो ‘लग्नाचा पोरगा फुकट’ म्हणत पोराचे वैशिष्ट्यदेखील सांगतो.
घासून घ्या, वावरात काम करायलाही तयार, घरजावई व्हायला तयार, भांडे घासता येते, कपडे धुता येते, स्वयंपाक करता येते, असा सूर लावत ‘लग्नाचा पोरगा फुकट!’ ही त्याची ऑफर सोशल व्हायरल झाली आहे. व्हिडीओतील विनोदाचा भाग सोडला तर, लग्नासाठी मुली मिळणे कसे कठीण झाले आहे, त्यावर रोखलेला कटाक्ष सामान्यांच्याही दिलको छू गया.
समस्येला हात घातलास. इथपासून मान गये गुरू, सोयाबीन सांगता येते काय, ऑफर फक्त काही दिवसांसाठी, त्वरा करा, अशा भन्नाट कमेंट त्यावर येत आहेत.