आनंदी लग्नाची इनसाईड स्टोरी The Inside Story Of Happy Marriage
काल एका नातेवाईकांच्या विवाहा सोहळ्याला धुळे जिल्ह्यातील मामांच्या गावाला आलो होतो!०९मार्च २०२३या दिवशी मंगल विवाहात वधू-वरांवर पवित्र अक्षदा वाहिल्या!अशा आनंद सोहळ्यात सर्व नातलग,आप्त,स्वकीय,मित्र परिवार भेटले!अनेक दिवसातून भेटल्याने चेहरे आणि दिवसांची उजळणी झाली!… विवाहाचा आनंद घेण्यासाठी आपण विवाहाला Jat-येत असतो!… यजमानांची धावपळ आपण निरखून पाहिली असेल का!तसा प्रत्येक घरात मुलं मुली असतात!ते या प्रसंगातून जातं असतातचं!या पवित्र सोहळ्यासाठी,आनंद निर्माण करण्यासाठी राबणारे मनं आणि हात दिसतं नसतात!.. त्यांच्यासाठीचं आजचा हा खटाटोप!
विवाह!… विविध नात्यांची गाठ बांधित असतो!अनेक नाते संबंध एका विवाहमुळे जोडले जातं असतात!विवाह नात्यांचा प्रसारक आहें!प्रचारक देखील असतो!त्यातून पोट नाते पुन्हा जन्म घेत असतं!आधीच नातं असतंच!पुन्हा त्याचं नात्यात अजून विवाह झाला तर नात्यांची पुनर्वसन देखील होत असतं!नवीन नाते घट्ट विनले जात असतं!गोधडी उभ्या आडव्या दोऱ्यांनी विणली जात असतें!अशी गोधडी ऊबदार असतें!नाते असेच जन्म घेत असतात!
वधू-वरास एकत्र आणण्यासाठी ज्यांनी आपलं शब्द वजन खर्च केलेले असतात त्यांचे ऋण असतं!उपकार असतात!विवाह योग जुळून येण्यासाठी अनेक व्यक्तींचा सहभाग असतो!वधू आणि वर पक्षातील व्यक्तींशी ज्यांचा जवळच संबंध असतो अशी व्यक्तिमत्व मध्यस्त म्हणून महान कार्य करीत असतें!त्या व्यक्तीमुळे दोन घरातील संबंध जुळून येतो!..
ज्यांच्याशी कधीही नाते नव्हतं!संबंध नव्हता!ओळख नव्हती पण त्यांच्यात अतिशय विश्वासू व्यक्ती मध्यस्ती म्हणून दोन्ही परिवाराची हमी घेतो, तेथे नवीन नाते जन्म घेत असतं!असं जन्म घेणारं नातं अनेक कसोटी पार करून जन्म घेत असतं!कधी कधी एकमेकांच्या परिवारातील सखोल माहिती काढण्यासाठी नात्यातीलचं एखादा व्यक्ती चांगले वाईट काय आहें का म्हणून अशी गुप्त यंत्रणा देखील कार्य करीत असतें!दोन्ही परिवारातील व्यक्तींचे संपूर्ण समाधान होतं!मुला मुलींची पसंती होते तेव्हा दोन घरांचा संबंध जोडला जात असतो!मुलगा किंवा मुलगी पाहणे हीं दुसरी पायरी असतें!पहिली पायरी हीं ‘कोणाचं आमंत्रण आलं आहें का?’.. अशी असतें!कदाचित परिस्थिती बघून पायऱ्यांच्या क्रमवारीत बदल देखील होऊ शकतो!
पहिली आणि दुसरी पायरी
यशस्वीपणे पार केल्यावर दोन्ही घरांच्या मान्यतेंनंतर साखरपुडा समारंभ आयोजित केला जात असतो!एंगेजमेंट झालं म्हणजे अर्ध लग्न झालं असं समजलं जात असतं!एकमेकांच्या संमतीनुसार विवाहाची तारीख आणि मुहूर्त निश्चित केल्यावर धावपळ सुरु होते!
ठरल्याप्रमाणे देणे घेणे असतं!खरी धावपळ सुरु होते ती बँडवाजा,घोडा, कार्यालय,बुक करणे ऐपतीप्रमाणे मुलगा-मुलगीच्या अंगावरील सोने घेणे!जेवणाचा मेन्यू ठरविणे! भावकी,मानपानाच्या नातलगांची यादी तयार करून, एकदोन वेळा कच्ची यादी नजरेखालून घालणे!शेवटी लग्नपत्रिका छापायला देणे!
विवाहाची तारीख पाठलाग करीत येत असतें!जवळ येत असतें!लग्नपत्रिका सर्व आप्त स्वकीयांपर्यंत पोहचविण्यासाठी यजमानांची धावपळ सुरु होते!कुणाला भेटली, नाही भेटली त्यासाठी मोबाईल करून पुन्हा विचारपूस होते!काहींना मिळाली नाही तर पून्हा ती लग्नपत्रिका संबंधित नातलगापर्यंत पोहचविण्यासाठी धावपळ होते!
…..अन ठरल्या तारखेला विवाह सोहळा आनंदाची वार्ता घेऊन दारात उभा असतो!पून्हा दारासमोर अन मंगल कार्यलयात मंडप डेकोरेशन बांधण्यासाठी असलेल्या यंत्रनेस आठवण करून द्यावी लागते!विवाहाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ असतो!हळदीचा पवित्र विधी यादगार असतो!पारंपरिक चाली रीतीनुसार नवरदेव नवरीसाठी हळद तयार केली जाते!हळद लावतांना जुन्या जाणत्या महिलांकडून पारंपरिक गाणे गायली जातात!धर्म,श्रद्धा,पावित्र्य,परंपरांना वाहिलेली गाणी परंपरणे मुखोदगतं असतात!हळदी समारंभ दोन कुटुंबाना एकत्र आणतो!हळद लागलेल्या कापसाच्या धाग्यातून नाती गुंफली जातात!हळदीचं जेवण देखील यादगार असतं!सदर यजमान नातलगांच्या उठ-बससाठी राबत असतो!
विवाहाचा दिवस येणाऱ्या पाहुण्यांसाठी आनंद सोहळा असतो!वधू-वरांच्या जीवनातील सर्वोच्च आनंद सोहळा असतो!दोन जीव पवित्र धाग्याने घट्ट बांधण्याचा दिवस असतो!लोकसाक्षीनें!मुखसाक्षीनें बंधनात अडकण्याचा दिवस असतो!आनंदालां पारावर नसतो!मंडप सजलेला असतो!कुठेही काही कमी पडू नये म्हणून यजमान राबत असतात!
विवाह मुहूर्तावर मंगल वाद्यांच्या, पवित्र अक्षदांच्या,विशाल
जनसमूहासमक्ष,देवा-ब्राम्हणाच्या मंत्रोच्चारांनी मंगलाष्टकांनी विवाह मंडपात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाला घालतात!अन भूतो न भविष्य असा शुभमंगल पवित्र ध्वनींच्या साक्षीने पार पडतो!अग्निसाक्ष सप्तपदीच्या मांगलिक सोहळ्यानंतर वर हा वधूच्या गळ्यात
पावित्र्याचे प्रतीक मंगळसूत्र घालतो!मुलीच्या माता पित्यांकडून कन्यादान होतं!धार्मिक,पवित्र,आनंद तसंच भावनिक असा हा सोहळा वधू माता पित्यांच्या डोळयांतून जीवनातील सर्वात महान कार्य संपन्न झाल्याचं समाधान दिसतं असतं!कन्यादान श्रेष्ठ दान आहें!महाभाग्य असतं!ज्या पोटच्या गोळयास जन्म देतं असतात!त्याचं मुलीचं दान विवाहाच्या दिवशी केलं जातं असतं!तुळशीला साक्ष मानून आई बाहेरून आनंदी असतें!आतून रडत असतें!जन्मापासून आजपर्यंत जिच्या सावलीत वाढलेला भाऊ देखील विवाह नंतर सासरी जाणाऱ्या बहिणासाठी आतून रडत असतो!
पारंपरिक परंपरेचा सन्मान राखत वर-वधूचे लग्न पार पडते विवाह नंतर आशीर्वाद द्यायला आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची सुरेख
व्यवस्था केलेली असतें!दोघेही पती -पत्नीच्या पवित्र बंधनात आणि मर्यादेत जीवनाची सुरुवात होते!
विवाह करून पहा!घर बांधून बघा!.. हे दोन्ही कार्य ज्या ज्या महाशयांनी पार पाडलीत ती जगातील कोणतीही समस्या सोडवू शकतात एवढा मोठा अनुभव गुरु त्यांच्या जवळ असतो!अशा अनेक विवाह समारंभासाठी जाण्याचा योग येत असतो!विवाह यजमानांच्या आर्थिक-मानसिक परीक्षा काळ असतो!आपण विवाहाचा आनंद घेत असतो!ते परीक्षा देतं असतात!… अशा सर्व वधू-वर माता पित्यांना माझा दोन्ही हात जोडून वाकून नमस्कार करतो!आपलं कष्ट आपल्याला माहीत असतं!मंगल विवाह आनंदात साजरा होतं असतो!धन्य ते माता पिता!!अशा सर्व माता पित्यांना नमस्कार अन अभिनंदन!
नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८ मो.नं-९९२३०७६५०० दिनांक-१० मार्च २०२३
![आनंदी लग्नाची इनसाईड स्टोरी The Inside Story Of Happy Marriage 2 आनंदी लग्नाची इनसाईड स्टोरी The Inside Story Of Happy Marriage](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2023/11/pexels-thirdman-8489759.jpg?resize=900%2C600&ssl=1)
3 thoughts on “आनंदी लग्नाची इनसाईड स्टोरी The Inside Story Of Happy Marriage”