तुम्ही जातीपातीच्या मारामाऱ्या चालू ठेवा पोरं पुढं निघालीत

तुम्ही जातीपातीच्या मारामाऱ्या चालू ठेवा पोरं पुढं निघालीत

आज महााष्ट्रातील मराठे — ओबीसी एकमेकांविरुद्ध भांडणाला उभे ठाकल्या सारखं चित्र दिसतंय.इतर छोट्या मोठ्या जातीही संघर्षाच्या तयारीत आहेतच.कोण चूक कोण बरोबर हा नंतरचा प्रश्न.पण वातावरण गढूळलय हे मात्र खरं.कोणीतरी जाणूनबुजून काड्या करतंय हे पण तितकंच खरं. त्यामुळे होतंय काय की मन बेचैन होऊन जातं राव.असो,काल मात्र तरुण पोरानी मनाला थोडी उभारी दिल्यागत झालं.
काल 15 डिसेंबर 2023 रोजी दोन वेगवेगळ्या लग्नाना हजर राहण्याची संधी मिळाली. पहिलं लग्नं लागलं अंधेरी साकीनाकाला.काजनी आणि विजय यांचं.पत्रिकेवर मुलांच्या बापाच्या आधी आईचं नाव आवर्जून छापलेलं.काजनी ही जयश्री आणि काशिनाथ निकाळजे यांची कन्या.तर विजय हा वनिता आणि अंकुश सावंत यांचा मुलगा. ती बौद्ध आणि तो मराठा.दोन्हीकडच्या लोकांनी मिळून थाटामाटात लग्न लावून दिलं.मुलाकडचे तयार होते बौद्ध पद्धतीने लग्न लावायला.पण रिपब्लिकन चळवळीत वाढलेले आणि नेतृत्व पदी पोहोचलेले काशिनाथ निकाळजे मोठ्या मनाने त्यांना म्हणाले,आमची मुलगी तुमच्या घरी जाणार आहे.तुमच्या पद्धतीने होऊ द्या ! परस्परांच्या समजुतीने विवाह सोहळा अधिकच रंगतदार झाला.विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील नात सूना आवर्जून या मुलांना आशीर्वाद द्यायला हजर राहिल्या.
दुसरं लग्न लागलं 14 तारखेला कोर्टात.विजेता भोनकर आणि चंद्रकांत उतेकर यांचं.दोघेही सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले.ती कुणबी.म्हणजे आजच्या भाषेत ओबीसी.तर तो मराठा.15 तारखेला दोघांनी नवी मुंबईत मस्त रिसेप्शन केलं.दोघांच्या घरचे,मित्र परिवार आणि छोटे मोठे कार्यकर्ते उत्साहाने यावेळी उपस्थित झाले होते.अगदी घरचं लग्नं असल्यासारखे धमाल करत होते.कोण कोणत्या जाती धर्माचा असला प्रश्न पण कोणाच्या ध्यानी मनी नव्हता.खासकरून तरुण पोरापोरीनी यात लयच पुढाकार घेतला होता.
माय बाप हो,तुम्ही जातीपातीच्या मारामाऱ्या खुशाल चालू ठेवा.तरुण पोरं पुढच्या दिशेला निघालीत…!

— रवि भिलाणे
( 16 / 12 / 2023 )

तुम्ही जातीपातीच्या मारामाऱ्या चालू ठेवा पोरं पुढं निघालीत
तुम्ही जातीपातीच्या मारामाऱ्या चालू ठेवा पोरं पुढं निघालीत

Leave a Comment