पगाराचे आकडे आणि शिक्षणाच्या अटीचा मुलींनी आग्रह न धरता योग्य वयात लग्न करावे
मुलीचे लग्न लांबणीवर
मुलगा आय टी क्षेत्रातील असावा, पगार लाखात असावे, स्वतःचा फ्लॅट, छोटे कुटुंब तेही पुण्यातील मुलगा अशा अपेक्षेमुळे मुले मुलीचे लग्न लांबणीवर पडत आहे. पूर्वी वय १८ ते २५ च्या आत होणारे लग्न अलिकडे या हट्टापायी ३० ते ४० वर्षापर्यंत पोहचले आहे. विवाहसंस्था ही आर्थिक व ऐष आरामावर आधारित विचार न करता एक पवित्र बंधन म्हणून समजून योग्य वयामध्ये मुला-मुलींनी लग्न करावे. पगाराचे आकडे व शिक्षणाचा दर्जा हे विवाहसंस्थापेक्षा श्रेष्ठ मानू नये असे विचार सौ. स्वाती सिरसुल यांनी पद्मशाली समाज महिला मंडळाचे अध्यक्षपदावरुन महिलांना संबोधन करताना व्यक्त केले.
तरुण-तरुणीमध्ये उच्च शिक्षण हा सुध्दा अडसर ठरत आहे. मुलगा डॉक्टर, इंजिनिअर असेल त्याच क्षेत्रातील मुलगी तीही अनुरुप पसंतीला उतरेल अशी मुलगी मिळावी या हट्टापायी अनेकांचे वय ३५ वर्षाच्या पुढे ओलांडले आहे. शिवाय व्यापार इतर व्यवसाय तसेच शेती करणाऱ्या मुलाबरोबर लग्न करण्यास मुली तयार होत नाहीत. असे प्रश्न मांडून सौ. सिरसुल यांनी कुटुंबातील व्यक्ती सुरुवातीपासूनच त्यांना समुपदेशक करुन या अपेक्षा न धरण्याचा सल्ला द्यावा असे आवाहन केले.
यावेळी लता पुलगम यांनी पुण्यातील मुलगा स्वतःचा फ्लॅट व चार चाकी गाडी आणि कुटुंबात वयोवृध्द नको या अपेक्षा मुलींनी धरु नये असे सुचविले.
अनेक उच्चशिक्षित मुलींचा पुणे, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद अश्या मोठ्या शहरातील मुलांकडे लग्नाचा ओढा वाढत आहे. आठवड्यातील ५ दिवस ड्युटी व दोन दिवस हॉटेल आणि मौजमजा करणे यामुळे कुटुंबातील जेष्ठाचे मार्गदर्शन नवीन होणाऱ्या पिढीला मिळणार नसल्यास त्याचे जीवन भविष्यात अंधारमय येईल. याकडे श्रीमती रंजना क्यादर या जेष्ठ महिलेने समाजाचे लक्ष वेधले.
सौ. विजया बोडके, रुक्मिणी संदुपटला, ललिता बल्लाळ, शारदा सुंकी, ज्योती बिजा, सुनिता कुरापाटी, सुषमा क्यादर, अंबिका बोगा वगैरे महिलांनी चर्चेत भाग घेतला.
ज्योती बिज्जा यांनी आभार मानले. मुला- मुलींना लग्नाबाबत जागृत करुन योग्य वयात लग्न करणेसाठी महिलांनी अशा सभेचे आयोजन करावे असे ठरले.