लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा
एक सुंदर पत्र Marathi Matrimony
सध्याच वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत .प्रत्येकालाच आपलं म्हणणं, करिअर महत्त्वाचं वाटतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षाच असला पाहिजे.अशा बऱ्याच शंका, धास्ती ज्या मुली लग्न करण्यासारख्या झाल्या आहेत त्या मुलींच्या आईच्या मनात येतात.
अशीच एक आई तिच्या मुलीचं लग्न ठरलेले आहे आणि तिला पत्रातून काही गोष्टी सांगत आहे
त्यानिमित्ताने आईचे लाडक्या लेकीला पत्र
प्रिय बेटा गोड पापा व आशीर्वाद,
लेक लाडकी माहेरची होणार सुन तु सासरची ” यानिमित्ताने आईकडून हे पत्र खास तुझ्यासाठी पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुझ्या मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी
कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत
दोन घराण्यांचे रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे
बेटा ,विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं. उंबरठ्यावरच माप ओलांडताना पहिल्या पावला बरोबरच हजारो मैलांचा नवीन प्रवास सुरू होणार आहे.तेच पहिलं पाऊल विश्वासाने पडलं की पुढचा प्रवास सुखकर होईल .हे पाऊल घरात टाकताना तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली की संसार सुखाचा होईल..हे लक्षात ठेव. आणखी एक ,सुख हे बूमरँग सारख असतं ,दुसऱ्याला दिल की फिरून ते आपल्यापाशी येतं
तु समजूतदार आहेस. पण माझ्यातल्या आईला काळजी वाटते म्हणून हा पत्रप्रपंच,
बेटा ,विवाह यशस्वी होण्याचं गुपित फक्त योग्य जीवनसाथी मिळवण्यात नसून योग्य जीवनसाथी बनण्यात आहे संसार सुखाचा करण्यासाठी दोघे एकमेकांचे सोबती व्हा, बारीक-सारीक तडजोडी स्वीकारा. हट्टीपणा कमी केलात तर सगळेच हट्ट पुरवले जातील. कुटुंबातील सदस्यांचा आदर राख , प्रेमाने वाग ते ही मग तुला आपली मानतील, प्रेम, सुख तुला ही नक्कीच मिळेल
महत्त्वाचं मोबाईल , फेसबुक व्हाट्सअप, चॅटिंग पासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न कर. त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा घरांमध्ये संवाद ठेव .थोड अवघड जाणार आहे पण सवय कर
एक राहिलंच, फावल्या वेळात किंवा रोज मला फोन करण्यापेक्षा सासुबाईंशी संवाद ठेव . छोट्या छोट्या गोष्टी मला फोनवरून सांगण्यापेक्षा सासूबाईंचा सल्ला घे. मला तर काय तुझ्याशी गप्पा मारायला आवडेलच पण नकळत माझी माया तुला माझ्यातच गुंतवून ठेवले. त्यापेक्षा तू सासुबाईंशी मैत्री कर त्याच तुझ्या हितचिंतक व मार्गदर्शक आहेत. माझे व पप्पांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच
तुझे बालपण , अल्लडपणा संपून आता तू गृहिणी होणार आहेस. तुझ्या आगमनाने त्या घरची तू भरभराट करशील दोन्ही घराण्याचे नाव उज्वल करशील हे नक्कीच
बेटा ,तुला वाटेल आधुनिक काळात मी पत्र लिहिले आहे पण हेच पत्र तुझ्या कायम सोबत असेल मोबाईल मधील मेसेज सारखे डिलीट होणार नाही.. तुला खूप खूप आशीर्वाद
तुझीच लाडकी
आई उर्फ मम्मी
या पत्राला सकाळ पत्रलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालेले आहे.