लग्न सराई लेख
माझ्या लेखणीतून थेट
आज नेहमीप्रमाणेच माझा अनुभव /भावना व्यक्त करत आहे. आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव काहीतरी धडा शिकवूनच जातो. ज्याने आपली दरवेळी सुखाची /समाधानाची व्याख्या बदलत जाते.आज माझ्या बहिणीचं लग्न, अतिशय आनंदाचा क्षण आणि मी तिला शब्दरुपाने पाठवणी देत आहे, कारण प्रत्यक्ष मी सोबत नाहीये तिच्या. काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. त्या स्वीकारून पुढे जाणे योग्य… 2 दिवसापूर्वी आम्ही निघणार इतक्यात माझ्या मुलीला ताप आला, वाटलं पडेल फरक… पण तो वाढतच गेला. त्यात तिला “बालदमा “. त्यामुळे दमट वातावरणात 550 km प्रवास करणे योग्य नाही असं dr. रांनी सुचवले..
“माझ्या बॅगा आणि डोळ्यांचा कडा दोन्ही भरलेल्या..”
छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो एकमेकींच्या आणि तिच्या लग्नाला मी नसेल ही कल्पनाच पटेना… भाचीला बरं नाही म्हणून तिचाच फोन आला, आणि तीच म्हणाली तू अजिबात येऊ नकोस आम्ही (प्रतीक्षा आणि पवन )पुन्हा एकदा लग्न करु तुझ्यासाठी पण डोळे पूस आधी.. मला न बघता तिला कळली माझी अवस्था.. हे
च ते प्रेमाचे बंधन. तिचीही अवस्था वेगळी नसणार यात शन्काचं नाही.. पण हा क्षण का निसटला हातून याची खंत राहू नये म्हणून तीच माझी समजूत काढत होती.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी ती हजर आणि मी मात्र हतबल.पण माझ्या मुलीचा त्रास बघता बरं झालं प्रवास टाळला असंही वाटलं.
एक म्हण आठवते आज.. पूर्वी असे म्हणत कि,
“पोटचं आलं कि पाठचं विसरतो”.. म्हणजे मुलं बाळापुढे इतर बाबी गौण्य असतात, तेच महत्वाचे.. खरं सांगू विसरत बिसरत काही नाही. उलट जास्त गुंततो आपण.. माझ्या लेकिंचं तितकंच प्रेम आहे मावशीवर.. आणि हो ती माझी मावसबहीण फक्त नात्याने तशी सख्खीचं बहीण आहे.. प्रत्येक वेळी हजर असायची.. आणि पुढेही असेलच..
पण मला अशा गोड बहिणीला नौरीच्या रूपात, रेशमी चुडा भरलेला, मेंदी काढलेला हात सगळं अनुभवायचं होत..पण नेहमीप्रमाणे मी हेच म्हणेल..” त्याच्या मर्जीपुढे काही चालत नाही..
“माझी शब्दरूपी पाठवणी “
“पाठवणी बहिणीची “
मंगल समयी कशास हवे डोळयांत पाणी?
स्वर्ग नवा खुणावतो, नको समजूस पाठवणी.
लाडात वाढली आजवर “बिडवईंची “राणी..
अमूल्य साथ “पवन”ची लाभली तवं जीवनी..
घेऊन जा ओंजळीत आठवणींचे गोंदण .
आठव गोड क्षण,कसे सरले अंगणी बालपण..
सावली बनून पाठीशी नित्य उभा भाऊ..,
मातृ-पित्याच्या प्रेमात सदैव निघाली न्हाहून.
सप्तपदी ने साथ चालता, येई पूर्तता जीवनी…
हातात देऊन हात, चाल चांदण्यात सुखानीं..
दोन डोरले, माहेर -सासर गुंफुनी धाग्यात..
सौभाग्य लेवून कर गृहप्रवेश “कुलकर्णी “घरात..
न होणार परकी तू कधीच अमुच्यासाठी..
लेक सदैव जन्मते, दोन घरे उद्धरण्यासाठी..
संस्कारांचे मोती, प्रेमाचा झरा असते मुलगी,
जीं लक्ष्मीस्वरूप ती होईल कशी मग परकी.?
हक्काने ये” उंबरा “पाहिलं तुझी वाट..
अन्नपूर्णा, बाळकृष्ण जा घेऊन सवेत..
संसार वेली फुलूदे, दरवळू दे सुगंध..
दंग हो संसारात जशी.. “राधा कृष्ण संग “…
लहान बहीण नसून आहेस माझीच तू लेक…
वेळप्रसंगी झालीस, आईची सावलीही तूच..
डोळ्याच्या कडा आज पानावल्या जरी माझ्या..
आनंद ओसंडतो आहे, सुखी रहा तू सदा..
आनंद ओसंडतो आहे, सुखी रहा तू सदा..
पुढील वैवाहिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा
प्रतीक्षा आणि पवन तुम्हा दोघांना..
तुझीच ताई 🙏
सौं. माधवी जोशी इनामदार.
23/12/2024