विवाहबाह्य अनैतिक संबंध
विवाहबाह्यसंबध एन्जॉय की एन्ड जॉय? Extra Marriage Affair
अलिकडेच “विवाहितांची आनंददायी रिलेशनशीप” हा लेख माझ्या वाचनात आला, ज्यात “विवाहित स्त्री-पुरुषसुद्धा त्यांची विवाहबाह्य रिलेशनशीप एन्जॉय करू शकतात. त्याला आता व्यभिचार समजले जात नाही.”
असं म्हणत विवाहबाह्य संबंधांची गरज व महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला स्पष्टपणे दिसत होता. “विवाहसंस्थेच्या माध्यमातून माणसाच्या भावनिक गरजा पूर्ण होत नसतील तर अशी विवाहसंस्था काय कामाची?” असा थेट प्रश्न विचारून विवाहसंस्थेच्या त्रुटींवर प्रकाश टाकत विवाहबाह्य संबंधांचे उदात्तीकरण करण्याचा मार्ग संबंधित लेखकाने निवडला होता.
संपूर्ण लेख वाचून झाल्यावर माझ्या मनात निरनिराळया कल्पनाचित्रांचे थैमान सुरु झाले. समजा कायद्याने विवाहबाह्य संबंधाना संमती दिली आणि त्या लेखात मांडणी केल्याप्रमाणे विवाहित स्त्री-पुरुष आपले विवाहबाह्य संबंध एन्जॉय करायला लागले तर नजिकच्या भविष्यात समाजाचं आणि समाजातल्या कुटूंबांचं चित्र नेमकं कसं असेल?
हा प्रश्न माझ्या मनात फेर धरु लागला. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा की करु नये? असं द्वंद्व काही काळ मनात चाललंही; मात्र समाजकार्याचा अभ्यासक, कौटूंबिक समुपदेशक, आणि ‘माणसं लग्न का करतात?’ या बहुचर्चित पुस्तकाचा लेखक या नात्याने मी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं दायित्व स्वीकारलं आणि माझ्या विचाराची दिशा निश्चित झाली.
वास्तविक, बदलत्या काळानुसार समाजात हवेसे आणि नकोसे असे अनेकविध बदल घडून आले आहेत, घडत आहेत आणि यापुढेही असे बदल घडणार आहेत. या बदलांचा बरा-वाईट परिणाम आपल्या वैवाहिक नातेसंबंधावर आणि पर्यायाने कुटूंब व्यवस्थेवर होतो आहे. स्त्रियांचे शिक्षण व त्यातून जागृत होणारी त्यांची अस्मिता, स्त्रियांचा अर्थार्जनातला वाढता वाटा आणि त्यातून पुढे आलेला स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह, व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि त्यातून पुढे आलेली निर्णय स्वातंत्र्याची संकल्पना यामुळे सर्व स्तरांवरच्या वैवाहिक नात्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होतो आहे.
या तणावाचे योग्य रितीने व्यवस्थापन केले जाणे ही आजच्या समाजाची अत्यंत मूलभूत गरज बनली आहे. दुर्दैवाने या नेमक्या दुखण्यावर उपाययोजना करण्याऐवजी समाजाचा मोठा वर्ग अत्यंत उथळपणे विचार करीत असल्याने नेमक्या समस्येला थेट भिडून समस्या सोडविण्याऐवजी समस्यांना पाठ दाखवून अनाठायी उपायांचा अवलंब करण्यात येत आहे. विवाहबाह्य संबंध एन्जॉय करण्याचा विचार हा त्यातलाच एक प्रकार आहे.
विवाह विषयातले समाजात आढळून येणारे वास्तव हे कल्पनेहूनही कठोर आहे. समाजात होणाऱ्या एकूण विवाहांपैकी सुमारे ९७% विवाह हे असंतुष्ट असतात तर केवळ ३% विवाह हे संतुष्ट, आनंदी किंवा समाधानी असतात असे एका संशोधन अभ्यासात आढळून आले आहे. असे असले तरी असंतुष्ट असलेल्या या विवाहांपैकी बहूसंख्य विवाह हे विवाहसंस्था व कुटूंबसंस्थेने घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे तडजोडीने टिकविले जातात. हे आपण आपल्या भारतीय समाजाचे मोठे सांस्कृतिक यश समजायला हवे.
विवाहाने स्त्री- पुरुषांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक गरजांची पूर्तता होत नसेल तर अशावेळी त्या स्त्री- पुरुषांनी आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करायला काय हरकत आहे? असा प्रश्न विचारणाऱ्या तथाकथित विद्वतजनांनी विवाहाची संकल्पना नीट समजून घ्यायला हवी.
विवाहसंस्था अस्तित्वात येण्यापूर्वी स्त्री- पुरुषांचे मुक्त शरीरसंबंध मानवी समाजात प्रचलित होते. एकमेकांच्या मर्जीने कोणताही पुरुष आणि कोणतीही स्त्री यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित होत असत. हा इतिहास सर्वपरिचीत आहे. या शरीरसंबंधातून स्त्री- पुरुषांच्या शारिरीक, मानसिक व भावनिक गरजांची पूर्तता होत असे. या काळात कधीही स्त्रियांवर बलात्कार झाले नाहीत. या शरीरसंबंधातून जन्माला येणाऱ्या बाळाचे मातृत्व कुणाचे? हे निश्चित होत असले तरी बाळाचे पितृत्व कुणाचे? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे मिळत नव्हते आणि हे चित्र पुरुषांसाठी अन्यायकारक असल्याने स्वीकारार्ह नव्हते.
अशा परिस्थितीत पुरुषांचे पितृत्व निश्चित व्हायचे असेल तर स्त्री-पुरुषांमधील मुक्त शरीरसंबंधांवर मर्यादा आणणे आवश्यक होते. अशी मर्यादा आणण्यासाठी वयात आलेली एक स्त्री आणि एक पुरुष यांनी आपल्या जोडीदाराची निवड करुन एकमेकांशी निष्ठा रारावी म्हणजेच एकमेकांप्रति लगनभाव जपत शरीरसंबंध प्रस्थापित करावेत अशी प्रथा निर्माण करण्यात आली.
या प्रथेलाच ‘लग्न’ असे संबोधन देण्यात आले आहे. ‘विवाह’ हा ‘लग्न’ या संकल्पनेचाच समानार्थी शब्द असुन त्यामध्ये स्त्री-पुरुष दोघांनीही एकमेकांसाठी ‘विशेष प्रकारे वाहून घेणे’ अर्थात संपूर्ण समर्पण करणे अपेक्षित आहे. या अपेक्षेतूनच पुढे विवाह संस्थेची वाढ व विकास झाला. विवाहसंस्थेच्या सुगम वाटचालीसाठी उपयुक्त अशा विवाहविषयक कायद्यांची निर्मिती करण्यात आली व घटनात्मक पातळीवर त्यांचे प्रभावी निर्वहन करण्याचा प्रयत्न आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे.
सुरुवातीच्या काळात जात आणि धर्माच्या परिघात होणारी लग्नं ही आता जात आणि धर्माच्या पलिकडे गेली असली तरी आर्थिक सुबत्ता, प्रॉपर्टी यांच्या आधारे होत असलेली आर्थिक देवाण घेवाण, खर्चिक समारंभ करण्याची क्षमता, घराण्यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रीचे सौंदर्य या मुद्द्यांवरून ठरतात. अशा परिस्थितीत सर्व विवाहीत जोडपी सर्व बाबतीत संतुष्ट राहणे केवळ अशक्य असते. परिणामी असंतुष्ट जोडप्यांची संख्या प्रचंड वाढते.
पूर्वीच्या काळात लग्नाआधी होणाऱ्या पती-पत्नीची मतं, त्यांचे आपल्या जोडीदाराबाबतचे विचार, आवड- निवड असं काहीही विचारात घेतलं जात नव्हतं. “लग्नाचं वय झालंय, चांगल स्थळ आलंय, ते हातातून जायला नको.” किंवा “मुलगा किंवा मुलगी नात्यातले आहेत, कमावते आहेत, बाहेर काही प्रकरण करेल, कोणासोबत पळून जाईल त्याआधी लग्न लावून मोकळे झालेले बरे,” किंवा “वेळेत मुल-बाळ होणं गरजेचं आहे, जबाबदारी पार पाडायची आहे.” किंवा “काही मजबुरी आहे, मागे भावंड आहेत,
बहिणी आहेत, आई वडील नाहीत नातेवाईक निर्णय घेणार आहेत, परिस्थिती गरिबीची आहे.” किंवा “तोलामोलाचे स्थळ आहे, घरात काम करायला, हातभार लावायला कोणी नाही.” या आणि अशाच मुद्द्यांवर लग्न जमवली जात. थोड्याफार फरकाने परिस्थिती बदलली असली तरी आजही मोठ्या प्रमाणात लग्नं याच पद्धतीने ठरवली जाताना दिसतात. अशा परिस्थितीत लग्न करणारे दाम्पत्य संपूर्ण संतुष्ट राहणे कठीण असते. अगदी परस्पर संमतीने लग्न झालेली असतील, लव्ह मॅरेज झालेले असेल तरी तो विवाह शेवटपर्यंत व्यवस्थित टिकेल, दोघेही आयुष्यभर एकमेकांना साथ देतील आणि एकमेकांशी प्रामाणिक राहतील अशी शक्यता खूप कमी असते.
संसार उत्तम रितीने सुरू राहील आणि विवाहाचा हेतू साध्य होईल याची शाश्वती नसते. थोडक्यात कोणताही विवाह हा शंभर टक्के यशस्वी आणि आदर्श नसतो असे चित्र निदर्शनास येते आहे.
काही ठिकाणी पती अथवा पत्नीला एखादा शारीरिक अथवा मानसिक आजार असतो. कधी दोघे दिसायला एकमेकांना अनुरूप नसतात. कधी दोघांच्या वयात खूप अंतर असते. कधी शैक्षणिक तफावत असते तर काही ठिकाणी त्यांचे वैचारिक मतभेद असतात. त्यामुळे आवडी- निवडी, सवयी, स्वभाव जुळत नाहीत.
कधी कधी करिअरच्या बाबतीत एकदम टोकाचे भिन्न विचार असतात. काही ठिकाणी तर शारीरिक संबंधांच्या बाबतीत कोणीतरी एकजण खूप उदासीन असते. काही केस मध्ये पैसा, व्यावसायिक गरज, नौकरी, करिअर इ विषयक समस्यांमुळे पती- पत्नी एकमेकांपासून दूर राहत असतात. काही जोडप्यांना ठराविक वयानंतर आपली निवड चुकलीय याची जाणीव होते पण वेळ निघून गेलेली असते. कधी मुलं होत नाहीत म्हणून पती- पत्नी निराश झालेले असतात. त्यामुळे अनेकदा दोघांतील शारीरिक संबंध बंद झालेले असतात. काही ठिकाणी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो.
एकमेकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. अपशब्द वापरले जातात. मारहाण केली जाते. कौटुंबिक हिंसाचार केला जातो. यामुळे जोडीदार मनातून पुरता उतरून गेलेला असतो. दोघेही सुशिक्षित आहेत, कमावते आहेत, दोघे एकत्र नांदत आहेत, सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडत आहेत, त्यांची मुलं-बाळं उच्च शिक्षण घेत आहेत, आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य आहे, सोईसुविधांनी भरलेलं घर आहे, करिअर आहे, उच्च जीवनशैली आहे मात्र शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजांच्या पूर्ततेबाबत दोघेही किंवा दोघांपैकी एकजण नाखुष आहे असे चित्र आलीकडच्या काळात अनेक कुटूंबात सर्रास दिसू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर दोघांच्या एकमेकांना सुखी ठेवण्याच्या कल्पना, भावनिक आधाराच्या अपेक्षा, शारीरिक सुख आणि समाधान देण्या-घेण्याच्या पद्धती यात कुठेही जरासे कमी पडत असतील तर त्यांची खूप घुसमट होते. अशा गोष्टी घरात, नातेवाईकांत कोणालाही सांगता येत नाहीत. उलट बदनामी होण्याची भीती वाटत असते.
अशा गोष्टीवरून वाद घालणे, भांडण करणे, मतभेद व्यक्त करणे यामुळे कुटूंबविशेषतः मुलं डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. आपल्याला हवं ते, हवं तस, हवं तेव्हा मिळत नाही, अशा जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य घालवणं मोठं जिकीरीचं होतं. या आणि अशा परिस्थितीमधून मधला मार्ग काढण्यासाठी घटस्फोट न घेता, एकत्र राहून, अनेक विवाहित स्त्री- पुरुष दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडणे, त्यांच्यात जवळीक निर्माण होणे, त्यांच्या शरीरसुखाच्या आणि समाधानाच्या संकल्पना जुळणे अशा गोष्टी कळत नकळत घडतात. इथपर्यंतची गोष्ट वेगळी आहे.
अशा लोकांना योग्य पध्दतीने जाणीव करुन दिली तर त्यांच्या वर्तनात सुधारणा होऊ शकते. मात्र आपली गरज भागविण्याच्या इराद्याने जेव्हा या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात, या गोष्टींचे उघडपणे समर्थन केले जाते तेव्हा परिस्थिती नियंत्रणात राहू शकत नाही. एकमेकांची प्रतारणा होते. एकमेकांना फसवण्याची स्पर्धा सुरु होते. यातून संसार विस्कळीत होण्याची शक्यता वाढते. प्रसंगी एकमेकांचा जीवही पणाला लागतो.
विवाहबाह्य संबंधात सुरुवातीला कुणी कितीही समजुतीने, गोडीगुलाबीने रहात असतील तरी नात्याच्या एका टप्प्यावर मानवी स्वभावाला अनुसरून स्वामीत्वभावना जागृत होते. आपल्या हक्क व अधिकारांची जाणीव होते आणि संघर्ष सुरु होतो. सुखाचा संसार आधीच मातीमोल झालेला असताना असा संघर्ष वाट्याला येतो तेव्हा स्वतःला सावरणही कठीण होऊन जातं.
एकदा असा संघर्ष सुरु झाला की, समोरच्याला गृहीत धरणं, स्वतःच्या सोयीने वापरणं या गोष्टी घडू लागतात. हळहळू एकमेकांना ब्लॅकमेल करणं, अडचणीत आणणं, आर्थिक भरपाईसाठी अट्टाहास करणं, कोर्टात केसेस दाखल करणं अशी पावलं टाकली जातात. शेवटी ज्या समाधानाच्या किंवा आनंदाच्या शोधात हे सगळं करण्याचं खुळ डोक्यात घेतलं ते आपल्या सुख, समाधान आणि आनंदाला संपूर्ण खिळखिळं करुन ठेवतं हेच खरं!
थोडक्यात विवाहबाह्य संबंध हा एन्जॉय करण्याचा विषय ठरु शकत नाही तर तो आपल्या वैवाहिक आयुष्याचा एन्ड जॉय ठरु शकतो! याचं भान कौटुंबिक समुपदेशक म्हणून समाजात काम करणाऱ्यां व्यक्तींनी ठेवायलाच हवं.
© श्री अनिल आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक सावेडी
तुमच्या आनंदी आयुष्याचे तुम्ही चोर तर नाहीत ना?
