उच्चशिक्षित विवाहितातील वाढता घटस्फोटाचा कल
“A Sociological Study of Growing Trends of Divorce in Educated Married”
प्रस्तावना
“उत्कृष्ट विवाह म्हणजे परिपूर्ण जोडपे एकत्र आल्यावर नसतो, तर एक महत्त्वाचे जोडपे त्यांच्यातील मतभेदांचा आनंद घेण्यास शिकते तेव्हा असते.” – डेव्ह मुरार
“A great marriage is not when the perfect couple comes together but it is when an important couple learns to enjoy their differences.” – Dave Meurar
विवाह आणि कुटुंब या दोन सामाजिक संस्था
प्रत्येक समाजात विवाह आणि कुटुंब या दोन सामाजिक संस्था विशेष महत्त्वाच्या असतात. कारण त्यांच्यात ताण-तणाव निर्माण झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तिच्या कौटुंबिक संबंधावर पडतो. कुटुंब संस्था ही एक प्राथमिक समूह आहे. कुटुंबातच व्यक्तिचे सामाजीकरण होत असते. कुटुंब या संस्थेत काही समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम प्रत्यक्ष कुटुंबातील सर्व सदस्यांवर होत असतो. म्हणून सामाजिक समस्येचे अध्ययन करीत असताना कुटुंबाच्या समस्येचे अध्ययन करणे आवश्यक ठरते. नागरिकत्व, औद्योगिकरण, आधुनिकीकरण, बदलती सामाजिक मूल्ये, कुटुंबाच्या कार्यात झालेला बदल, समाजातील बदलत असलेल्या स्त्रियांचा दर्जा व भूमिका, व्यक्तिवाद, आधुनिक संपर्कमाध्यमे (विवाहाचे बदलते स्वरूप, विवाहाची ऐच्छिकता इ.) कारणांमुळे आधुनिक काळात कुटुंबसंस्थेअंतर्गत विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. परिणामी कुटुंब विघटन घडून येत आहे.
आज भारतीय समाजात विवाह संस्थेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. विवाह हा पवित्र संस्कार म्हणून मानला जातो. या पवित्र संस्कारामुळे विवाह संस्थेबरोबर कुटुंबसंस्था ही भक्कम व संस्कारक्षम होत असते. या दोन्ही संस्थांना समाजात विशेष असे महत्त्व आहे. परंतु आधनिक काळात शिक्षण, तंत्रज्ञान, जागतिकीकरणामुळे या दोन्ही संस्थांवर प्रचंड प्रमाणात विपरित परिणाम होत आहेत. त्याबरोबरच नवीन कायदे स्त्रीला मिळालेले कायद्याचे संरक्षण या संरक्षणात्मक कायद्यामुळे स्त्रीकडून मोठ्या प्रमाणात घटस्फोट घेतले जात आहेत. अशा स्वरूपाची संशोधनात्मक मांडणी होणे गरजेचे आहे.विवाहसंबंधाच्या आधारावर वेगवेगळ्या कुटुंबातील पुरुष आणि स्त्री हे पती आणि पत्नीच्या नात्याने एकत्र येऊन कुटुंबाची स्थापना करतात. पण प्रत्येक कुटुंबातील सदस्यातमतभेद आढळतातच.
कौटुंबिक तणाव अधिक प्रमाणात
आधुनिक काळात कौटुंबिक तणाव अधिक प्रमाणात आढळून येताना दिसतात. कौटुंबिक तणावाचा परिणाम प्रामुख्याने पती-पत्नीच्या संबंधावर होत असतो. सवयी, उद्देश, ध्येय, अभिरूची, संपत्ती परंतु याशिवायही आर्थिक क्षेत्रातील पत्नीचे स्वातंत्र्य व व्यावसायिक तणाव यामुळे कौटुंबिक तणाव वाढत आहेत. त्यातून परित्याग (Desertion), विलगीकरण (Separation), कुटुंब विच्छेदन (Family Disorganization) इ. समस्या निर्माण होतात.
कुटुंब विघटन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, ती कौटुंबिक तणाव, परित्याग व नंतर घटस्फोट या अवस्थेतून जात असते. घटस्फोट ही कुटुंब विघटनाची अवस्था असून घटस्फोटानंतर कायदेशिरित्या कुटुंब व विवाह संपुष्टात येतो.
आज भारतीय समाजात घटस्फोट ही एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. पुर्वी आपल्या देशात घटस्फोटाची समस्या तीव्र नव्हती. परंतु शिक्षणाचा प्रसार, मुलीचे शिक्षणातील वाढते प्रमाण, नागरिकरण, औद्योगिकरण, आधुनिकीकरण, सामाजिक मूल्यांतील बदल इ. कारणांमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोटामुळे पती-पत्नीतील वैवाहिक संबंध संपुष्टात येतात. तसेच कुटुंबाचे विघटनही घडून येते. म्हणून घटस्फोटास कुटुंब विच्छेद (Family Disorganization) असे देखील म्हटले जाते.
मागील दशकामध्ये भारतीय सामाजिक व्यवस्थेत जागतिकीकरण, आधुनिकीकरण व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बदल होत आहे. याचा परिणाम विवाहसंस्था व कुटुंबसंस्थेवरही होत आहे. विवाहाबद्दलची पारंपरिक मानसिकता बदलून आधुनिक मानसिकता तयार होत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने आधुनिकीकरण, ओद्योगिकीकरण, आर्थिक स्वयंपूर्णता, माहिती तंत्रज्ञानाचा वापर इ. मुळे विवाहाकडे बघण्याचा तरुणांचा कल बदलत आहे.
विवाहपूर्व लैंगिक संबंध व विवाहानंतरचे विवाहबाह्य संबंध याला दिवसेंदिवस सामाजिक मान्यता मिळत आहे. यामुळे विवाह हा पवित्र संस्कार ही संकल्पना बदलून तो आधुनिक युवकांचा अडथळयाचा संस्कार ठरत आहे. तसेच न्यायालयीन निर्णय, स्त्री सबलीकरणविषयक कायदे इत्यादींमुळे विवाहाची प्रासंगिकता पुर्वीच्या तुलनेत कमी होत आहे
सामाजिक जीवनाची एक गरज म्हणून विवाहसंस्था अस्तित्त्वात आली. विवाहसंस्थेमुळे मनुष्याच्या कामवासनेला वैधता प्राप्त करण्यात आली. विवाहाने केवळ रतिसुखच मिळत नसून त्याशिवाय विवाहात वंशवृद्धी, संगोपन, सहजीवन, गृहस्थधर्मपालन करुन समाजाचे स्थैर्य राखले जाते. पुढे-पुढे विवाहसंस्थेला दीर्घकालीन स्थिरता यावी म्हणून धार्मिक भावनेची त्या बंधनाना जोड देण्यात आली. हिंदू विवाह हा एकदा झाला की कायमचा समजला जातो. म्हणून घटस्फोटास परवानगी नव्हती. ज्यू धर्मात घटस्फोटाचे अधिकार होते. ख्रिश्चन धर्मात पती-पत्नी परस्पर संमतीने घटस्फोट होतो. (कॅथालिकमध्ये मान्य नाही) मुसलमानात विवाह हा करार समजला जातो. इतकेच नव्हे तर तोंडी तलाख मिळतो.
घटस्फोटाला पूर्वी ‘काडीमोड’ किंवा ‘सोडचिठ्ठी’ असे म्हणत असत
स्त्रियांच्या अनेक समस्या आहेत. त्या पुरुषप्रधान व सांस्कृतिक, धर्माच्या बंधनातून निर्माण झालेल्या आहेत. देवदासी, घटस्फोटिता, लिंगभेद इ. समस्या स्त्रीच्या शोषणातून झालेल्या आहेत. आधुनिक काळात घटस्फोट ही ज्वलंत समस्या बनली आहे. विवाहाची बंधने शिथिल होत आहे.
आधुनिक काळात स्त्रियांना स्वातंत्र्य, सामाजिक मूल्यातील परिवर्तन, आर्थिक स्वातंत्र्य, कौटुंबिक तणाव, विरोधी स्वभाव, जीवन पद्धतीत भिन्न इ. घटस्फोटाच्या पारंपरिक कारणापेक्षा आधुनिक कारणाचा ऊहापोह महत्त्वाचा आहे. त्यात नोंदणी विवाह, जोडीदाराची निवड पसंतीनुसार, स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन, स्त्री-पुरुष समान हक्काची संकल्पना, परस्परविरोधी स्वभाव, आवडी-निवडी, स्व-सन्मान (Self respect), आत्मविश्वास, माहिती-तंत्रज्ञान, वाढता व्यापार, कामाच्या वेळेतील बदल, घटस्फोटिताकडे बघण्याचा समाजाचा बदलता दृष्टिकोन इ. आज घटस्फोट ही व्यक्तिची केवळ वैयक्तिक बाब बनली आहे.
आर्थिक स्वयंपूर्णता, विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांना मिळत असलेली संमती (औपचारिक) विवाह न करता एकत्र राहणे यास कायद्याची मान्यता, विभिन्न जीवनशैली, आंतरराष्ट्रीय विवाह, इगो व विसंगत अनुरूपता, एकल पालकत्व, बदलती लैंगिक भूमिका, लिंगभावाबद्दलची जागरुकता, सुरक्षित स्त्री जीवन इ. अनेक कारणांमुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतात जगाच्या तुलनेत घटस्फोटाचे प्रमाण हे तुलनेने कमी आहे. जवळपास १००० विवाहामागे ११ विवाह मोडतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात घटस्फोटाचे प्रमाण कमीत कमी आहे. पण भारतात अजूनही अधिकृत आकडेवारीची नोंद ठेवली गेली नाही. अमेरिकेत ५०% तर भारतात १.१% आहे. पण १९९० नंतर जागतिकीकरणाच्या स्वीकारामुळे भारतात मेट्रो व अर्ध शहरी भागात घटस्फोटाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. ते फक्त उच्च वर्ग व मध्यवर्गातच आहे. साधारणपणे घटस्फोट हे लग्नानंतर पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षात ८५% होतात. वयोगट हा २५ ते ३५ मध्ये ७०% आहे.
![उच्चशिक्षित विवाहितातील वाढता घटस्फोटाचा कल 2 Divorce](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2023/10/pexels-alex-green-5699780.jpg?resize=900%2C600&ssl=1)
3 thoughts on “उच्चशिक्षित विवाहितातील वाढता घटस्फोटाचा कल”