विवाह सोहळ्यात होणारा अमाप खर्च कमी करा
दैनिक पोलीस शोध
संपादकीय,
विवाह सोहळ्यात होणारा
अमाप खर्च कमी करा !
विवाह समारंभ मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. काळानुरूप विवाह सोहळ्यांमध्ये होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. हौसेला किंमत नसते या म्हणीनूसार ज्या कुटूंबांची थोडक्यात विवाह करण्याची क्षमता आहे, त्या कुटूंबात देखील अनुकरणातून ज्या पद्धतीने विवाह समारंभांवर अमाप खर्च होतो आहे त्यावर समाज हितातून निर्बंध घालण्याची काळाची गरज आहे.
सामाजिक स्तरावर वावरतांना समाजात अनेक बाबतीत बदल झालेले आढळून येतात. संयुक्त कुटूंब व्यवस्था जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. ‘हम दो हमारे दो’ अशा प्रकारे चौकोनी किंवा त्रिकोणी कुटूंब व्यवस्था निर्माण झाली आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने कृषी व्यवस्थेवर अवलंबून राहणारी कुटूंब व्यवस्था आता दिसत नाही. मुलींचे शिक्षणाचे आणि उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने पुरूषांसह महिला देखील स्वावलंबी होत आहेत. महिला घरबाहेर पडायला लागल्या आहेत. दोन पैसे कमविण्यासाठी त्या लाहन मोठे व्यवसाय करायला लागल्या आहेत.
त्यामुळे ‘चार भिंतीच्या आड’ ही महिलांसाठीची संकल्पना आता बदलत चालली आहे. जगात आणि देशात सर्वच क्षेत्रात अमुलाग्रा बदल झाल्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती होतांना दिसत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संपूर्ण जगात क्रांती झाली आहे. माहितीचा स्फोट झाला असून जगातील घटनाक्रम अवघ्या काही वेळातच सर्वांना दिसतात. महानगर, राजधान्यांचे शहर, चित्रपट, दूरदर्शनच्या विविध चॅनलच्या माध्यमातून आता प्रत्येक क्षेत्रातील बदल घरात बसून बघायला मिळत आहेत. त्यातच चित्रपटांचा, विविध वाहिन्यांवरील धारावाईकांचा प्रभाव मानीव जीवनावर मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे त्यामुळे अनुकरण वाढत असल्याने आपला आवाका आणि क्षमता याचा विचार न करता प्रत्येक गोष्टीत खर्च वाढतांना दिसतो आहे.
त्यामुळे आर्थिक क्षमतांचा आवाका नसताना देखील आवाक्याबाहेर जावून खर्च करण्याची मनोवृत्ती वाढते आहे. त्यात विवाह समारंभ, वाढदिवसाचे कार्यक्रम, रिंग सेरेमनी, साखरपुडा यावर ज्या पद्धतीने अमाप खर्च केला जातो आहे तो कोणत्याही बजेटमध्ये न बसणारा आहे. साखरपुडा किंवा रिंगसेरेमनी सारख्या लहानशा कार्यक्रमांमध्ये एकेकाळी केवळ 20 ते 25 लोक असायचे त्या कार्यक्रमांमध्ये आता एक ते दिड हजार लोक केवळ साखरपुड्या सारख्या कार्यक्रमासाठी बोलविले जातात. विवाह समारंभ देखील आप्तेष्ट, स्वकीय, जवळचे नातेवाईक अशा दोनपाचशे लोकांमध्ये संपन्न व्हायचे परंतू आज विवाह समारंभांचे स्वरूप ग्रामीण भागात देखील भव्य-दिव्य झाले असून क्षमतेपेक्षा जास्त खर्च केवळ हौस आणि अनुकरणापोटी करण्यात येतो आहे.
त्यामुळे एका आठवड्यात नवदेव शेतात कामाला जातांना दिसतो किंवा कामावर तरी जातांना दिसतो. वधू आणि वर दोन्ही पक्षांकडून मात्र लग्न समारंभावर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. डिजे पासून तर आतिषबाजी पर्यंत आणि वर्हाडींची संख्या हजाराचे वर अशा धामधूमीत होणारे विवाह हे दोन्ही कुटूंबांना कर्जबाजारी करणारे आहेत. आपल्या चुकीच्या परंपरा आणि प्रथांवर संत तुकडोजी महाराज यांनी ग्राम गीतेत ज्या शब्दात आसूड ओढले आहेत ते प्रत्येक समाजातील प्रत्येक माणसासाठी डोळ्यात अंजन घालणारे आहेत.
लग्न समारंभामध्ये दोन्ही पक्षांकडून होणारा खर्च जर पाच लाख रूपये असेल तर त्यापैकी चार लाख रूपये वधू-वरांचे दोघांचे नावावर बँकेत ठेवा आणि उर्वरीत एक लाखात अत्यंत साध्या पद्धतीने विवाह समारंभ करा अशी कल्पना कुणाच्याही मनात का येत नसावी ? परंतु अनुकरणाचे ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर फॅड आले आहे की, कुणाही एकण्याच्या मनःस्थितीत नाही. गुर्जर समाजाने काही ठराव करून गुर्जर समाजात वेळेवर लग्न लावणे, मोठ्या प्रमाणावर खर्च न करणे, प्रिवेडींग शुटींगवर बंदी अशा प्रकारचे समाजहिताचे निर्णय घेतले आहेत.
ब्राम्हण समाजात आजही शिस्तबद्ध पद्धतीने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह होतांना दिसतात. मारवाडी, गुजराथी समाजानेही आता विवाह समारंभात केवळ सहा पदार्थ ठेवण्याचे नियम लागू केले आहेत. या समाजात 50 पेक्षा जास्त मेनू जेवणावळीत असतात आणि लहानशा व्यापार्याला देखील समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे अशा प्रकारचा अनावश्यक खर्च करावा लागतो. आणि यातून सामान्य माणसाची कुचंबना होवू लागली आहे. त्यामुळे राज्यातील बारा बलुतेदार समाजासाठी सामुदायिक विवाह आज काळाची गरज असल्यचे सिद्ध होते आहे. समाजात शेतकरी मुलांना, व्यवसाय करणार्या मुलांना मुली मिळत नाहीत अशी सर्वच समाजांची परिस्थिती आहे. त्यामुळे सामुदायिक विवाह सोहळ्यातून शेतजमीन असलेल्या, लहान मोठ्या व्यवसाय करणार्या मुलांना प्रधान्याने मुली देण्याची मानसिकता होण्याची देखील आवश्यकता आहे.
अवघ्या दहा ते वीस लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याची, कमीत कमी खर्चात विवाह समारंभाचे नियोजन करण्याची सुरूवात करण्याचा हा काळ आहे. विवाहांवर होणारा अमाप खर्च मुला-मुलीचा नवा संसार, नवा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना द्या. आणि ज्या मंडळींनी केवळ 50 रूपयात दोन हार घेवून नोंदणी पद्धतीे विवाह केले आहेत त्यांना विचारा की त्यांचा संसार किती सुखाचा सुरू आहे. विशेष म्हणजे अशा पद्धतीने नोंदणी विवाह करून किंवा सामुदायिक विवाह समारंभामध्ये विवाह करून समाजात एक नवा पायंडा पाडण्याची नितांत गरज आहे.
ज्यामुळे प्रचंड धनसंपत्तीचा, अमूल्य वेळेचा, होणार्या अपघातांचा, खर्च होणार्या इंधनाची बचत ही देशाच्या विकासात सुद्धा मोलाची भर घालणारी ठरेल. यामुळे समाजात आर्थिक विषमता देखील निर्माण होते आहे. यावर सर्वच समाजातील पालकांनी, उपवर मुला-मुलींनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे. सुरूवात करण्याची गरज आहे. यात यश निश्चित मिळेल. विवाहांवर प्रचंड खर्च करून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बाप जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्या कुटूंबाच्या वेदना कुणालाही कळत नाहीत.
परंतू शेतकर्यांच्या आत्महत्यामागे विवाहांसाठी किंवा अन्य समारभांसाठी केला जाणारा खर्चाचा मुद्दा सुद्धा प्रकर्षाने समोर येतो तेव्हा पश्चातापाशिवाय कोणताही इलाज हातात नसतो. म्हणून विवाह साठी कर्ज घ्यावे लागत असेल, शेत गहाण ठेवावे लागत असेल, शेत विकावे लागत असेल, घर गहाण ठेवावे लागत असेल तर समजून घ्या तुम्ही विनाशाकडे वाटचाल करीत आहात. तुमचा ‘आर्थिक मृत्यू’ खूप जवळ आहे हे समजण्यास हरकत नाही. त्यामुळे विवाहांवर होणारा खर्च टाळण्यासाठी समाजसेवकांनी, सामाजिक संघटनांनी, राज्यकर्त्यांनी, बुद्धीमान लोकांनी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
तुर्तास एव्हढेच
1 thought on “विवाह सोहळ्यात होणारा अमाप खर्च कमी करा”