Table of Contents
लग्न समारंभातील चिंतन करायला लावणारे घटनाक्रम सामाजिक प्रश्न
सामाजिक स्तरावर विचार करायला लावणार्या लग्नांच्या कथा !
महाराष्ट्रात एकीकडे राजकीय पक्षांची मूल्यहिन धुमश्चक्री सुरू आहे, तर दुसरीकडे लग्नांची रेलचेल सुरू असून लग्न समारंभातील चिंतन करायला लावणारे घटनाक्रम सामाजिक प्रश्न म्हणून उभे ठाकले आहेत. घरातील विवाह समारंभ हा प्रत्येक कुटूंबासाठी आनंदाचा विषय असतो तरी हा समारंभ जिवघेण्या दिशेने वाटचाल करतो आहे, यावर समाजाने वेळीच विचार करायला हवा.
सण ‘इव्हेंट’ म्हणून साजर्या होऊ लागली
भारतीय संस्कृतीत सोळा संस्कारांपैकी विवाह सोहळा हा एक महत्वपूर्ण संस्कार मानला जातो. एकेकाळी केवळ गोरज मुहूर्तावर होणारा हा सोहळा आता काळानुरूप सकाळी सॅण्डर्ड वेळेनूसार ही होवू लागला आहे. परंतू विवाह सोहळ्याच्या स्वरूपामध्ये जे बदल झाले आहेत ते कृषी संस्कृतीशी निगडीत नाहीत. आलिकडच्या चार दशकात शिक्षणाची व्याप्ती वाढली, औद्योगिकरण वाढले, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. शहरांचे विस्तारीकरण झाले. आणि यातच दूरदर्शनचे विविध चॅनल्स, चित्रपटांचे कथानक आणि यांचे स्वरूप देखील बदलले. यातून ‘अनुकरण’ आणि ‘अधांनूकरण’ या बाबी देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या. या सर्वांचा परिणाम हा भारतीय सणांवर, विवाह समारंभावर देखील झाला. वाढदिवस साजरा करणे, लग्नाचा वाढदिवस साजरा करणे, ओटी भरण्याचा कार्यक्रम, होळी, दिवाळी, दसरा, गणपती उत्सव, रंग पंचमी हे सर्व सण साजरे करण्याच्या पद्धती या ‘इव्हेंट’ म्हणून साजर्या होऊ लागल्या.
विवाह समारंभ प्रतिष्ठा,पैसा, मोठेपण दाखविण्यासाठी साजरे होऊ लागले
त्यात विवाह समारंभ हे आपली प्रतिष्ठा, आपला पैसा, आपले मोठेपण दाखविण्यासाठी साजरे होऊ लागले असून यात स्पर्धा लागली आहे. एकेकाळी नवरदेव कटींग करून, सेव्हींग करून लग्न मंडपात यायचा, आता तो दाढी वाढवून, हातात तलवार येवू लागला आहे. वधू मुलगी ही मेकअपसाठी ब्युटीपार्लरमध्ये किमान तीन ते चार तासासाठी जाते. आणि मंडपातील लोक घरातील मंडळी वधू केव्हा येईल याची वाट पहात असतात.
यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे विवाह ठरला म्हणजे ‘रिंग सेरेमनी’चा भव्य-दिव्य कार्यक्रमात किमान एक हजार लोकांना निमंत्रण दिलेले असते. याचवेळी महागडे मोबाईल एक-दूसर्याला भेट दिले जातात. आणि प्रि-वेंडीग शुटींगसाठी नवर्या-मुलाला आणि मुलीला राजस्थान, बैंगलोर, समुद्र किनारी पाठविले जाते. विवाह मंडपात मोठ्या स्क्रीनवर त्यांचे व्यक्तीगत फोटो हे वर्हाडींना दाखविले जातात.
भव्य-दिव्य लग्नमंडप, डोळ्यांना दिपविणारी रोषणाई, कानाचे पडदे फाटतील, हृदयाचा ठोका चूकेल अशा प्रकारचे डी.जे., आतिषबाजी, विवाहाचे भव्य-दिव्य स्टेज आणि खूप मोठा रसोळा, त्यासोबत पाणीपूरी पासून तर विविध प्रकारचे चॅट, मसालाडोसा, पावभाजी, आईसक्रीम, खाण्याचे विड्याचे पान अशा थाटात मेनूंची व्यवस्था केलेली असते. यावर कडी म्हणजे विवाह वैदिक पद्धतीने घरात लावून घेतले जाता आणि ज्या मंडळींना पत्रिका दिलेली असते ती मंडळी धावपळ करत वेळेवर लग्न लागेल या विचाराने विवाह मंडपात उपस्थित होतात. तेव्हा लक्ष्यात येते की त्यांच्या वेळेवर जेवणाचा कोणताही उपयोग नाही.
आपल्या पद्धतीने लग्न समांरभ पार पाडणे ही आता ‘फॅशन’
आपल्या मनाला वाटेल त्यावेळेला तीन ते चार तास उशिरा लग्न लावले जातात. आलेली सर्व मंडळी स्वतःला वेठबिगार समजून मनातल्या मनात पश्चातापदघ्द होतात. काही हुशार मंडळी मंडपात हजेरी लावून सरळ निघून जाणे पसंत करतात. अर्थात वेळेवर लग्न लावणे, वेळेवर रिंगसेरेमनी कार्यक्रम संपन्न करणे हे लग्न घरातील मंडळीचे काम असते. परंतू आलेल्या पाहुण्यांची कोणतीही पर्वा न करता आपल्या पद्धतीने लग्न समांरभ पार पाडणे ही आता ‘फॅशन’ झाली आहे. जी येणार्या कोणत्याही मान्यवरांना आवडत नाही. परंतू नातेसंबंध ‘मेन्टेन’ करण्यासाठी पाहुणे अशा प्रकारांवर आपल्या घरात आल्यावर टीका करतात. अशा प्रकारांवर आपण प्रखरपणे लिहावे अशी चर्चा करणारे समाजातील काही मान्यवर मंडळी आमच्या समाजवादी मित्राला विनंती देखील करतात. समाज कोणताही असो, जवळपास सर्वच समाजामध्ये आता असे प्रकार सर्रासपणे होऊ लागले आहेत.
गुजर समाजाने अखेर कठोर निर्णय घेतला
नंदुरबार शहादा तालुक्यातील गुर्जर समाजाने या संदर्भात अंत्यत कठोर निर्णय घेतल्याने या समाजातील विवाह वेळेनूसारच होतात. जेवणावळी सुद्धा वेळेवर संपलेली असते. प्रि-विडींग शुटींगवर या समाजात बंदी घालण्यात आलेली आहे. तर मारवाडी-गुजराथी समाजात केवळ 12 मेनू पेक्षा जास्त मेनू करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रश्न असा आहे की, समाजाजवळ पैसा जास्त झाला, की कर्ज काढून दिवाळी साजरी होते आहे यावर चिंतन करायला कुणाजवळी ही वेळ नाही.
याचवेळी ब्राम्हण समाज आपल्या परंपरेनुसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आजही कमी खर्चात विवाह सोहळा साजरा करतांना दिसतात. एकमात्र निश्चित की आपली प्रतिष्ठा आणि उंची खुप मोठी आहे या अविर्भात होणारे विवाह समारंभ हे चूकीचा पायंडा पाळणारे ठरत आहेत. यातून सामान्य कुटूंबाची होरपळ होत असून यातून काय निष्पन्न निघत आहे तर शून्य. दुसर्याच दिवशी भव्य अशा विवाहसमारंभावर चर्चा बंद होवून जातो. नंतर कुणी नाव सुद्धा घेत नाही.
वेगवेगळ्या प्रकारचे विवाह समारंभ
विविध समाजातील लहान-मोठ्या विवाह समारंभामध्ये आमच्या समाजवादी मित्राचा सहभाग असतो. याच आठवड्यात आम्ही तीन वेगवेगळ्या प्रकारचे विवाह समारंभ पाहिले.
एक विवाह समारंभ हा अत्यंत सामान्य घरातील होता. ज्यामध्ये वधूपिता पन्नास खूर्च्यासुद्धा आणू शकला नव्हता. त्या समारंभात वरपिता अत्यंत सन्मानाने खाली गादीवर बसलेला होता. परंतू हा विवाह सोहळा एव्हढा शांततापूर्ण व आनंदी दिसत होता तिथे कोणत्याही पक्रारचा दिखावा नव्हता.
दूसरा विवाह सोहळा हा मध्यम वर्गीय कुटूंबातील होता. परंतू हा विवाह दूपारी तीन वाजता लागल्याने मंडपातील पाहुण्यांच्या चेहर्यावर कोणतेही हास्य नव्हते. या सोहळ्यात आपण का आलो असा पश्चाताप त्यांचे चेहर्यावर दिसत होता. तर
तिसरा एक विवाह समारंभ हा कोट्याधिश माणसाकडे होता. हजारो लोकांना निमत्रंण दिले होते. परंतू या विवाह समारंभात कोणतीही शिस्त नव्हती, जेवणावळीचा ठिकाणा नव्हता. परंतू मान्यवरांची उपस्थिती खुप मोठी होती. लोक औपचारिकपणे भेटून निघून जात होते.
अशा प्रकारचे अनेक अनुभव जे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी अयोग्य आहेत. यावर सर्व समाजातील समाज धुरिणांनी चिंतन करण्याची गरज आहे. आणि हे जीवघेणे प्रकार, खोटी प्रतिष्ठा दाखविण्याचे प्रदर्शन, वेळेचे महत्व नसणे यावर चिंतन होण्याची आवश्यकता आहे.
![सामाजिक स्तरावर विचार करायला लावणार्या लग्नांच्या कथा ! 2 सामाजिक स्तरावर विचार करायला लावणार्या लग्नांच्या कथा !](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2023/12/fb_img_17013707643544927283644072504630.jpg?resize=900%2C805&ssl=1)