लग्न जुळवून देता का

लग्न

नवरदेव!नवरी!किती किती सुंदर स्वप्नाळू-लग्नाळू कल्पना आहे नाही का ही!मनुष्य जन्म एकदाच मिळतो!विशिष्ट वय झालं की मुला मुलींची पसंती होते!आई-वडीलांची संमती मिळते!हिरवा कंदील मिळाला की प्राचीन परंपरे प्रमाणे विवाह संपन्न होत असतो!नवरदेव-नवरीचे लग्नानंतर जोडप्यात रूपांतर होतं!हे जोडपं विवाह वेदिवरील संसारसुख पूर्ण करण्यासाठी खंबाभोंवती फिरू लागतात!

लग्नस्वप्न पाहणारी कित्येक उपवर मुलं-मुली असतात!शिक्षण झालं!मजबूत शेती आहे!नोकरी आहे!सर्वकाही सुख दाराशी लोटांगण घालत असतांना ‘वय’ नावाचा पालुद घोड्यासारखं पळत असतं!

करियरच्या जोखंडात विवाह योग्य वय निघून जायला लागतं!पसंतीस असलेली स्थळं हातून जायला लागतात!वधू-वर संशोधन चालूच राहात!चेहऱ्यावरील जरठरेषा वय सांगायला लागतं!मग भल मोठं पॅकेज शोकेसमध्ये ठेवावसं वाटायला लागतं!घाम गाळून, कष्ट करून घेतलेल्या सुंदर बंगल्याच्या दारात हत्तीसारखी उभी असलेली गाडी चेष्टा तर करीत नाही ना?असं वाटायला लागतं!

वय निसटून जाण्याच्या आत तडजोड जन्म घेते आनंदी समाधाना ऐवजी तडजोड समाधानी होतं पसंती होते!नवरदेव घोड्यावर बसून वाजत गाजत लग्न मंडपात येतो!हळदीच्या अंगानें साज शृंगार केलेली ‘वधू’.. ब्राम्हण -वऱ्हाडासमक्ष फुलांचा हार घेऊन डेकोरेटिव लग्नमंडपी उभी राहते!

पै-पाहुण्यांसमक्ष स्पीकरवरील मंगलाष्टक कानावर पडू लागतात!पवित्र अक्षदांच्या वर्षाव साक्षीनें लग्न लागतं!…दोघांचे आई-वडील दीर्घ श्वास घेत म्हणतात,’चला सुटलो बुवा लागलं लग्न एकदाचं!झालं..आपलं कर्तव्य पार पडलं!’

लग्न महादिव्य असतं का?

लग्न महादिव्य असतं का?का खरचं अडथळ्यांची शर्यत असतें?पार करता करता दमछाक होते आहे?अनुभवी, जाणकार मंडळी नेहमी म्हणतं असतात ,’लग्न करून बघ मग कळेल!’ हे सत्य मान्य करावंच लागतं!योग्य वेळ,योग्य वय,नोकरी, शेती या गुणात्मक तडजोडीनीं मुला -मुलींचं लग्न स्वप्न साकार होत असतं!

घटस्फोट या मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय लग्नाची कोणतीही चर्चा पूर्ण होत नाही. येथे आपण प्रथम विवाह मोडण्याच्या शक्यता
घटस्फोट या मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय लग्नाची कोणतीही चर्चा पूर्ण होत नाही. येथे आपण प्रथम विवाह मोडण्याच्या शक्यता

अलीकडे मुलींचं उच्च शिक्षण अन नोकरीमुळे साहजिक मोठया अपेक्षा वाढल्या आहेत!त्यांची पूर्तता करता करता मुलांची दमछाकं होत आहे!मुलींची अपेक्षा असतें,’माझ्यापेक्षा जास्त नाही तरी माझ्या इतकं तरी शिक्षण,पगार असावा!’ लग्न एक खेळ समजावा का मग? त्यात जास्तीत जास्त पहिले पाच सहा जिंकतात!बाकीच्याचं काय?ऍव्हरेज असणारे ९५% असतात!त्यांनी काय करावं?

काही जन शिक्षण असूनही नोकरी नाही म्हणून शेती व्यवसाय सांभाळतात!त्यांना मुली मिळू नये? ज्यांच्या नावावर शेती नाही पण नोकरी आहे!आपण ते स्थळ पसंत करतो!शेती सातबारा नसलेले पगारी मुलं लग्न लावून संसार थाटून बसले आहेत!सातबारा असलेल्या मुलांना मुली मिळू नयेत? ही निश्चितचं शोकांतिका आहे!शेती आहे म्हणून आपण जगतो आहोत!शेतकरी राजा आहे म्हणून आपण उभे आहोत!राज्यास मुली मिळू नये?



आजची परिस्थिती अतिशय बिकट आहे!मागच्या पिढीने गर्भातील मुलींना स्वर्ग दाखवला होता!मुलींचं प्रमाण घटल्याने आज त्याचं पाप भराव लागत आहे!दारोदारी हिंडून, गावोगावी हिंडून वधू संशोधन सुरु आहे!वर संशोधन सुरु आहे!अनेक सामाजिक संघटना वधू-वर मेळावे आयोजित करीत आहेत!मुली आहेत!मुलं ही आहेत!लग्नास तयार नाहीत!मग घोडं अडलं कुठं? पूर्वी आई-वडिलांनी पाहिलेल्या मुलीसोबत लग्न करून आयुष्य काढावे लागायचं!संसार कसा निपुटपणे ओढला जायचा!

चित्र बदलत असतं!बदल परिवर्तनाचा नियम असतो!बदलात माणूस आतून बाहेरून इतका बदलला, इतका परीवर्तीतं झाला आहे की मुलं-मुली स्वतः स्थळं पसंती करू लागले आहेत!ते साहजिकच आहे!जमाना बदलला आहे!पण बऱ्याच ठिकाणी दुष्परिणामही डोळ्यसमोर येत आहेत!

मुला-मुलींनी स्वतःचं पसंत केलेलं लग्न मोडकळीस येत आहेतं!चट मंगणी झट शादीच्या खेळात काडीमोड का व्हावा?शरीरिक ओढ संपली की भानावर आलेली मंडळी ‘इगो’च्या नादी लागून लग्नगाठ, ती लग्नकाठी गुडघ्यावर ठेवून खाडकन मोडून तोडून टाकतात!थोडा सुद्धा विचार करीत नाही!

लग्न वधु-वर मेळावे

वधु-वर मेळावे मोठया प्रमाणात घेतले जात आहेत!नोंदणी मोठया प्रमाणात होत आहेत!आता अलीकडं तर एक महत्वपूर्ण बाब समोर आली आहे की मेळ्याव्यातील नोंदी नुसार घटस्फोटीतांचं वाढतं प्रमाण निश्चितचं भूषणवह नाही!

लग्न म्हणजे खेळ नाही,जेव्हा वाटेल तेव्हा मोडून तोडून टाकावा?ही प्रचंड मोठी सामाजिक समस्या होऊ पाहात आहे!घटस्फोटाने समस्या सुटतात का आपणच त्याचा विचार करावा!थोडीफार सुद्धा तडजोड करायची नाही?

वधू-वर-पालक मेळाव्यात प्रथम विवाह नोंदणीच प्रमाण सुखवह असलं तरी घटस्फोतांचीं वाढती नोंदणी निश्चितचं क्लेशदायक आहे!अशा नोंदणीचां खेद वाटतो!जर प्रथम विवाहसाठी मुलं-मुली मिळणं कठीण झालं आहेचं तर पुन्हा दुसऱ्यां(दुजर) लग्न विवाहसं उत्सुक तरुण तरुणीसाठी अपेक्षित स्थळं मिळणं किती कठीण आहे याचा विचार करता घटस्फोट झाला नसता तर बरं झालं असतं असा पश्चातापाचा सूर हळूच मनातून यायला लागतो!

अहो रेगुलर नवविवाह उत्सुक तरुण तरुणीचं लग्न जमवायला कठीण होऊन बसले असतांना,पुन्हा परीक्षेला(घटस्फोटीत) बसलेल्यांकडे कोण पाहणार आहे बरं?खरचं ही ज्वलंत समस्या अनेक घरात पहायला मिळत आहे!

शेतकरी मुलाचीं लग्न होत नाही

शेतकरी मुलाचीं भरपूर शेती असून स्थळ येत नाही!कमी शिक्षणामुळे लग्न होत नाही!गरीब मजुरी करतो म्हणून लग्न होत नाही!फक्त नोकरी आहे पण शेती नाही तरीही लग्न होत नाहीये!कमी वयात विधवा झाली, विधुर झाला म्हणूनही पुन्हा स्थळं येत नाहीयेत!घटस्फोट झाला म्हणून लग्न होत नाहीयेत!आज गावागावात असे मुलं-मुली दिसतात,’वय वाढतंय तरी लग्न होत नाहीयेत!

प्रचंड अपेक्षाचं ओझं उरावर घेऊन बसलो आहोत!काही विधुर-विधवा दहा-दहा वर्षांपासून लग्नासाठी रांगेत आहेत, लग्न जमतं नाहीये!जिद्द सोडलेली नाही!रांगेत उभे आहेत!वय निघून चाललं आहे!मुलीचं असो वा मुलाचं वय झाल्यावर मार्केटच्या भाजीपाल्यासारख होऊन बसतं आहे!पाहिजे ते मोल राहात नाही!

कोणी माझं लग्न जुळवून देता का

दिनांक २५ मार्च धुलिवंदनच्या दिवशी सकाळीचं एका सदगृहस्तांचा मोबाईल फोन आला होता!कॉलर आय.डी वरून नाव कळलं होत,’तुम्हाला भेटण्याची उत्सुकता लागली आहे!’ असं त्यांच्या बोलण्यावरून कळलं!मी त्यांना ओळखलं होत!महाशय घरी आले!म्हणाले,’तुम्हाला वाटायला नको मला गरज नाही!फक्त फोनवरून सांगतो!मला लग्न करायचं आहे म्हणून घरी भेटायला आलो!काल पिपंरी येथील आचार्य अत्रे सभागृहात वधू-वर मेळाव्याला आलो होतो.’ मी तोपर्यंत आमचे सहकारी श्री.उदयभान पाटील यांना ही बोलावून घेतलं होतं!

सदर व्यक्ती घटस्फोटीत आहे!गेल्या बारा वर्षांपासून स्थळं शोधित महाराष्ट्र पालथा घातला आहे!वय होत ५७ वर्ष!मी माझ्या डोक्याला हात लावला होता!अजूनही लग्न करण्याची जिद्द पाहून आश्चर्य वाटलं!

लग्न जुळवून देता का
लग्न जुळवून देता का

कमी वयातली इतक्या मुलं-मुली विवाहयोग्य स्थळ शोधण्यात आपल्या चपला झिजवत असतांना त्या सदगृहस्थाची जिद्द सुद्धा मानली पाहिजे!त्यांच्या वयाला मुलगी म्हणजे बाई कमीत कमी ५० वर्षांची तरी हवी!पन्नाशी नंतर एखादा टक्के स्रिया संसार थाटायचा विचार करतील!मुलबाळ होणे या वयात शक्य नाहीच!उतार वयालां आधार हवा असतो!साथीची गरज असतें!हक्काची व्यक्ती, माणूस हवा असतो!वृद्ध काठीचा आधार हवा असतो!दोन वेळचं खाऊ घालणारी हक्काची व्यक्ती हवी असतें!म्हणून आज ५७ वर्ष वयाची व्यक्ती गेल्या १२वर्षांपासून लग्नासाठी आधार शोधित हिंडतो आहे!आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा,’ आता या वयात संसारात गुरफटण्या ऐवजी अध्यात्माकडे वळलात तर संसारमोह होणार नाही!’ पण त्यांनी आमचा प्रस्ताव नाकारून स्थळ पाहण्यासाठी आग्रह धरला!मोह सुटत नसतो!गरजांसाठी जीवन साथीदार हवा असतो!

पहा ना!..विवाह गरज आहे!सामाजिक स्थिरतेसाठी गरज आहे!विवाह योग जुळून येणें कधी कधी असं वाटायला लागतं सत्कर्माचं फळ असावं!चट मंगणी झट शादी होते!अन्यथा वयासोबत विवाहाच्या आशा धूसर होत जातात!विवाहाच्या आशेने जगणं सुरु असतं!

नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२६ मार्च २०२४

महागड्या विवाह समारंभांचे त्रांगडे

1 thought on “लग्न जुळवून देता का”

Leave a Comment