लग्नाचा वाढदिवस
लग्नाचा वाढदिवस marriage anniversary wishes in marathi
॥ “अगं ऽऽ “चा
व लग्नाचा वाढदिवस॥
लग्नाचा वाढदिवस
बरंं का संसारी पुरुषांनो,
तुम्ही सारं विसरलात तरी चालेल,पण आपल्या “अगंऽऽ”चा अर्थात आपल्या बायकोचा वाढदिवस विसरु नका रे बाबांनो !
( पहा बुवा,ज्येष्ठ अनुभवी या नात्याने चांगला सल्ला देणे आमचे काम आहे.तुम्ही एकदा विसरुन पाहा,मग कळेल)
म्हणुन मी आवर्जुन तो लक्षात ठेवतो.
(खरं सांगु का? लक्षात राहण्याचं कारण म्हणजे याच दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवसही आहे.ज्या दिवशी आपल्या बालपणीचे उच्छृंखल जगण्याचे स्वातंत्र्य जावुन,लग्नाच्या बेडीत अडकलेले पारतंत्र्य सुरु होते तो दिवस कोण बरं विसरेल हो?)
त्यामुळे या पारतंत्र्य दिवसाला मी वर्षभर घोकत (आणि भोगत)लक्षात ठेवतो.
तसा मी भाग्यशाली.
एकाच दिवशी तो असल्याने दुग्धशर्करा योग जुळुन येतो व एकाच केक मध्ये दोन्ही “हॅप्पी ऽऽ बर्थऽऽ डेऽऽ” साजरा होतात.
पुर्वीच्या जुन्या पिढीच्या बायका आपल्या पतीराज्याचे नाव उच्चारायलाही लाजायच्या,
मग मधल्या काळात बर्यापैकी नवर्याचे नाव घेवुन बोलु लागल्या.
आत्ता जमाना बदलला आत्ता फक्त
“अहो ऽऽ”
अशी लाडीक हांक मारतात.
म्हणुन आम्ही, जुन्या जमान्यातले असलो तरी,
या अहो च्या धर्तीवर
“अगऽऽ” असं लाडीक नाव ठेवलं आहे.
(काय मेलं या म्हातार्याचे लक्षण ! असं उगाचच कुणी नाक मुरडु नये,काळानुरुप आम्ही बदलु नये का?)
ईतरांच्या वाढदिवशी गंभीरपणे भरभरुन लिहिणारा मी बायकोच्या वाढदिवसाला का बरं असं लाईट्ली लिहावं?
अहो,संसार नावाचा प्रवासच वेदनांच्या वळणांनी भरलेला आहे.त्यात कशाला गंभीरपणे जगावे?
जीवन प्रवास आनंदी,सुखरुप व सुरक्षित करायचा असेल तर गंभीरपणे असं हलकं फुलकं जगावं हे आमचं तत्वज्ञान.
त्यामुळे ज्या कोणी विधात्याने स्वर्गातुनच आम्हा उभयतांची रेशीमगांठ बांधली आहे त्याचे मी शतशः आभार मानतो
प्रत्येक नवर्याला आपली बायको,लाखात एक वाटते.
पण मला नाही तसं वाटत,
(असं मी बोलल्यावर बायकोच्या भुवया उंचावुन ती डोळे ताणते,पण पुढच्याच क्षणी ..,)
माझी बायको,लाखात एक नाही,ती करोडोत एक आहे..
असं बोलताच,मघाशी ताठरलेले डोळे,प्रेमाने लवलवतात,
हा विनोद समजु नका.ही सत्य बाब आहे.
विधात्याने ही अशी गांठ का बांधली असावी?
बायको शायरी
ती शिस्तीची धनी
मी मात्र बेशिस्त
ती काटेकोर जगणारी
मी आपला बिनधास्त
मी हृदयाने निर्णय घेतो,
ती मेंदुने,
ती गंभीर
तर मी ऊच्छृंखल मनाने
एकाने पसरावे ,दुसर्याने आवरावे
अशी जरी कविता असली तरीही
मी फक्त पसरलेच.
आवरले कधी ही नाही,
अशा विरुध्द धृवावर आम्ही असतो,तरी सुखाने नांदतो.
सजातीय धृवांपेक्षा विजातीय धृवांचे मिलन शाश्वत असते
अशी आमची खट्टीमिठ्ठी जोडी.
त्याची गोडीच अवीट असते
लग्नानंतरचा संसार हा “अहो” व “अगं” चा असला तरी “अगं” चा म्हंजे बायकोचाच असतो,
तिच धागा असते
तिच कणा असते
तिच कळस आणि
तिच पायाही असते.
मग ती माणसाची असो की प्राणीमात्राची.
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी “अगं” तशीच..
गेली ४४ वर्षे ती माझा संसार रथ ओढते आहे.
मी ओढला फक्त कासर्याला हात लावुन.
रथाचे चाक भरकटु नये,अती वेगाने धावुन अपघातग्रस्त होवु नये म्हणुन मोगरी ची भुमिका, सुकाणुची भुमिका ,
रथाचे सारथ्य हे मात्र आम्ही आळीपाळीने करतो,
म्हणुन हा रथ प्रभावीपणे वाटचाल करतोय.
आज या “अगं” चा वाढदिवस ..
६३ वा.
या ६३ वर्षात ४४ वर्षे माझ्या संगसोबतीने ती आहे.
कधीच ३६ चा आकडा दिसला नाही.
असं कसं?
संसारात लुटुपुटुचे भांडण असावेच.
थोडासा रुसवा,
थोडासा फुगवा,
थोडीसी आदळ आपट
थोडासा दुरावा
हा तर असायलाच हवा.
तोच तर अवीट गोडी आणतो संसारात.
आमच्याही ४४ वर्षात तो येतच असतो.
परंतु
आम्ही उभयंता हारण्यासाठीच लढाई करतो.
कारण जरी एक जिंकला तरी दुसरा हारल्याचे शल्य आम्हाला बेचैन करते.
त्यापेक्षा साॅरी म्हणत हाराकीरी पत्करतो .
दुसर्याच क्षणी पेल्यातली वादळे निवतात हो.
सुखी संसारासाठी नवरा बहिरा व बायको मुकी असावी असं जाणकारांनी सांगीतले असल्याने आम्ही उभयता तसे बनतो,
विवादाला तोंड फुटण्यापुर्वीच तो निवतो.
त्यामुळे विवादांनाही खेद वाटुन ते स्वतःच संवादात बदलतात,
हेच तर आमच्या या ४४ वर्षांच्या वैवाहिक जीवनाचे रहस्य.
तिच्या या ६३ वयाची समोरसमोरची एकवाक्यता,
ऐक्य,प्रेम,सहवास हाच शाश्वत राहावा.
तिच्या जगण्यात
माझे जगणे
तिच्या सौभाग्यात
माझे असणे
तिला उदंड आयुष्य
संसार यातच वसणे
हिच शुभकामना.
तिला सोने,साडी वगैरे मी घेत नाही.तिलाही त्याचे वेड नाही.
घेतो फक्त ५ रु,चा गजरा नि
“अगं ऽऽऽ”
अशी दिवसभराची हांक.
ती या हांकेला जेंव्हा होकार देते तेंव्हा माझ्यातला “अहो” कुबेर बनतो,
कधी कधी माझ्या या हाकांना वैतागुन ती खेकसते
“काय पाढा लावला हो?”
तेंव्हा तिचे ते चिडणं,खेकसणं,त्रागा करणं हे पाहुन माझ्यातल्या नवर्याचे छान मनोरंजन होवुन मी आनंदी आनंदचा धनी बनतो.
संसारात अजुन काय हवे?
तिला खुपखुप शुभेच्छा
——तिचाच
“अहो”
——©MKभामरेबापु
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता