लग्नासाठी तडजोड
काही कठोर पावलं आणि समाज प्रबोधन या २ गोष्टीतूनच काहीतरी मार्ग निघेल असे माझे मत आहे.
तुम्हाला काय वाटते ?
हल्ली पालकांचे मुला-मुलींवर नियंत्रण राहिलंय नाही किंवा मुला-मुलींना लग्न संस्थेबद्दल गांभीर्य राहिलंय नाही. भविष्यात वाढून ठेवलेल्या अडचणी/बिकट परिस्थिती याबद्दल त्यांना भानच राहिलेलं नाही असं नाईलाजानं म्हणावं लागतंय. तडजोड नावाचा शब्दच यांनी डिक्शनरीतून काढून टाकलाय जणू.
सध्याची पिढी भ्रामक जगात वावरतेय. काही वर्षांनी याचे दुष्परिणाम आणि चटके बसू लागतील तेव्हा पश्चातापाची वेळ येणार आहे पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. पैसा/सगळ्या सुखसोई पायाशी लोळण घेत असतील पण त्यावेळी जवळ ना आई-वडील असतील किंवा सोबतीला पार्टनर असेल. स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागेल. उतरत्या काळात ४ गोड शब्द बोलून साथ करायला दुसर माणूस असणार नाही. जगण्याला अर्थ उरणार नाही. पैश्याची किंमत वाटणार नाही.
आपल्याशी ४ गोड शब्द बोलण्यासाठी माणसं शोधावी लागतील. जीवन व्यर्थ वाटू लागेल. पाश्चातालात होरपळायला होईल. भयाण वाटू लागेल त्यावेळी उपाय सापडणार नाही. मग “ओल्ड ऐज होम” जवळ करावं लागेल. हे भयाण चित्र आजच मला स्पष्ट दिसतंय.
माझ्या पाहण्यात अनेक मुला-मुलींनी तडजोड करून आपले संसार थाटलेत व ते आनंदात जगत आहेत. मुलगा काळा-मुलगी गोरी, मुलाला पगार थोडा कमी तर मुलीला भरपूर पगार, मुलगी एकदम गरीब घरातील तर मुलगा प्रचंड श्रीमंत, मुलगा ब्राम्हण तर मुलगी दुसऱ्या समाजातील, मुलगा धडधाकट तर मुलीत एखादे व्यंग आशा अनेक जोड्या मला माहित आहेत.
एकमेकाला जीव लावून ते आपले संसार करत आहेत. ते खरे शहाणे म्हटले पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.अन्यथा १५-२० लाखाच पॅकेज असलेली व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त पॅकेज असलेल्या पार्टनरची अपेक्षा करत आयुष्यातील अमूल्य वेळ वाया घालवत आहेत. लग्नच झालं नाही तर ते पॅकेज चाटायच का? ( नाईलाज आहे, मला हा शब्द वापरण भाग पडतंय).
लग्न दोघांचं असत. दोघानी मिळून संसार समृद्ध करायचा असतो. त्यात एक प्रकारची सहकार्याची भावना असते-सहजीवनाचा आनंद असतो. हे सगळं मनाला आनंद देत. काही कमी असेल तर त्याची पूर्तता करण्यात एक वेगळेच समाधान असते. पण हल्ली काहींनी स्वार्थपाई आपले जीवन पणाला लावले आहे.
१० लाखाच्या पुढे पकेज पाहिजे, स्वागताला स्वतःचा फ्लॅट आधीच तयार हवा, अमुक शहरातच नोकरी हवी, अमुक क्षेत्रातच नोकरी हवी. काय चाललंय?
हे कमी म्हणून काही हास्यास्पद अटी असतात. जशा, “फिरण्याची आवड हवी, सुस्वभावी हवा, समजून घेणारा हवा, मान देणारा हवा, पार्टनरचे स्वतंत्र विचार जपणारा हवा.” ह्या काय अटी झाल्या?!
हे सगळं लग्न झाल्यावर दोघांनी मिळून करायच्या गोष्टी असतात. हे सगळं तयार असेल तर लग्न झाल्यावर तुम्ही काय करणार? लग्न म्हणजे काय दागिना आहे का? गाडगीळ सराफांकडे जायचे आणि पैसे टाकून पॉलिश केलेला चकचकीत दागिना आणायचा?
आजची पिढी सुशीक्षित आहे असं म्हणतात पण तो सुशिक्षितपणा, सामंजस्य, तडजोड कुठे दिसत नाही. त्यामुळेच लग्न लांबत आहेत, उशिराने होत आहेत, पुढे पुढे होणारही नाहीत. या मुलं-मुलीचं आणि एकूणच संकुचित झालेल्या समाज्याच अस्तित्वच धोक्यात आलं आहे.
आमची पिढी आता संध्येकडे गेली आहे. जो काही विचार करायचा आहे तो आता सध्याच्या अति शिकलेल्या करायचा आहे.
पण एक महत्वाची गोष्ट मनात कोरून ठेवा, तुम्ही कितीही सधन व्हा पण ‘गेलेली वेळ तुम्ही कितीही पैसा ओतला तरी तुम्हाला परत आणता येणार नाही”.
आम्ही आमचे संसार तडजोडीने, एकमेकांनाच्या साथीने, सुख-दुःख वाटून घेत समाधानात जगलो. पुढच्या पिढीच्या चिंता मात्र आम्हाला अस्वस्थ करते.
श्री स्वामी समर्थ!
भावनेच्या भरात कुणी दुखावलं गेलं असेल तर क्षमा मागतो. केवळ चिंतेपोटी लिखाण केले आहे हे उदार मनाने समजून घ्या.