लग्नाळू मुलींच्या अपेक्षा अवास्तव आहेत काय?
लग्नाळू मुलींच्या अपेक्षा अवास्तव आहेत काय?
मागच्या आठवड्यात समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या लग्नाळू तरुण-तरुणींची एक ऑनलाईन बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील एम.एस.डब्ल्यू. झालेले अनेक तरुण-तरुणी या बैठकीत सहभागी झालेले होते. “माणसं लग्न का करतात?” या सुप्रसिद्ध पुस्तकाचा लेखक या नात्याने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मला या बैठकीस बोलावण्यात आले होते. यावेळी चर्चेत सहभागी असणाऱ्या मुला-मुलींसमोर सध्या कोणती आव्हाने आहेत? याविषयी सविस्तर चर्चा झाली. नोकरी आणि लग्न या दोन आव्हानांनी तरुण पुरते ग्रासून गेलेले आहेत असे यावेळी स्पष्टपणे दिसले.
तरुणींनाही अनेक प्रश्न पडलेले होते परंतु तरुणांसमोरच्या प्रश्नांची तीव्रता थोडी अधिक होती असे झालेल्या चर्चेवरून स्पष्ट होत होते. पोस्ट ग्रॅज्यूएट झालेल्या यातील अनेक मुलांची वयाची तीस वर्षे उलटून गेल्यावरही लग्न झालेले नाही. “आमचे लग्न होईल की नाही?” असा थेट प्रश्न मुलांनी मला विचारला तेव्हा त्याचे दाहक वास्तव किती गंभीर असल्याचे माझ्या लक्षात आले. काही मुलांनी तर “आम्ही आता आमचे लग्न होईल ही अपेक्षाच सोडून दिली आहे.” असे सांगून या प्रश्नाचे गांभीर्य आणखी वाढवले आणि सर्व समाजधुरिणांनी याबाबत पुरेसा कृतीशील विचार करण्याची तातडीची गरजही अधोरेखित केली.
लग्न जमविण्याबाबतचे आपले अनुभव सांगत असताना मुलं म्हणाली की, आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतलं आहे. शासकीय, निमशासकीय किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये नोकरी करून समाजातल्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याचं काम आम्ही करत आहोत. गरजेपुरते पैसे या नोकरीतून मिळत असले तरी आमच्या नोकऱ्या कंत्राटी स्वरुपाच्या असल्याने नोकरीची शाश्वती नाही. अशी असुरक्षित नोकरी करून आम्ही कितीही महान व समाजोपयोगी कामे करीत असलो तरी आमच्याशी लग्न करण्यास मुली तयार होत नाहीत.
मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आणि अवास्तव आहेत. प्रत्येक मुलीला पुणे, मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद अशा मोठ्या शहरात स्वतःच्या घरात राहणारा मुलगा हवा आहे.
मुलाचा पगार लाखात असायला हवा आणि मुलीला त्याच्यासोबत दिमाखात राहता यायला हवं. कोणतीही मुलगी खेडेगावात रहायला इच्छुक नाही. खेड्याचं एकवेळ जाऊद्या; पण उर्वरीत महाराष्ट्रातील तालुक्याच्या किंवा अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी रहायलासुद्धा मुली राजी होत नाहीत. मुलींना शेतीवाडीत किंवा छोट्या-मोठ्या दुकानदारीतही रस वाटत नाही. मुलाच्या आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यायला मुली मुळीच तयार नाहीत. त्यांना त्यांचं करिअर करीत छानछोकीनं राहाणं एवढंच हवं आहे.
अगदी समाजकार्याचंच शिक्षण घेतलेल्या मुलीसुद्धा याला अपवाद नाहीत! अशा मुली एखाद्या वेळी लग्नाला तयार होतात; पण त्यांचे पालक त्यांना तसं करू देत नाहीत. अशावेळी आमची लग्नं कशी होतील? असा प्रश्न मुलं मला वारंवार विचारीत होती.
एकविसाव्या शतकातला सुमारे पंचवीस वर्षाचा काळ सरत आलेला असताना लग्न ही एक सामाजिक समस्या म्हणून आपल्यापुढे मोठा आ वासून उभी राहिलेली आहे. यापूर्वी लग्नाशी संबंधित हुंडाबळी, घटस्फोट, विधवा पुनर्विवाह, परित्यक्त महिलांचे जगणे अशा काही समस्या आपल्याला भेडसावत होत्या. कायद्याच्या पातळीवर त्या समस्यांना आपण उत्तरं शोधली असली तरी त्यातल्या कोणत्याही समस्येचं समूळ उच्चाटन आपण अद्याप करू शकलेलो नाहीत.
हे वास्तव आपल्याला नजरेआड करता येणार नाही. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने विवाहसंस्थेचा वापर कौंटूंबिक सौख्यापेक्षा स्त्रियांच्या शोषणासाठीच अधिक केला आहे असं आपल्याला निखालसपणे म्हणता येईल असाच काहीसा आपल्या एकूण विवाहसंस्थेचा इतिहास आहे. आता तर लग्न न होण्याचीच समस्या उद्भवली आहे.
त्यामुळे लग्नविषयक आधीच अस्तित्वात असलेल्या वर उल्लेख केलेल्या इतर सर्व समस्यांपेक्षा अधिक गंभीर दुष्परिणाम होणार आहेत! समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या या तरुणांना या भयानक वास्तवाची पुरेपुर जाणीव झालेली आहे. लवकरच ती जाणीव इतर क्षेत्रातल्या तरुणांनाही तितक्याच तीव्रतेने होत जाईल याबद्दल माझ्या मनात कोणतीच शंका नाही.
सांप्रतकाळी लग्नाळू मुलींकडून आय.टी. इंजिनिअर, शासकीय अधिकारी, प्राध्यापक आणि शिक्षक यांना सर्वाधिक पसंती मिळते. डॉक्टर, वकील, संशोधक यांना त्याच क्षेत्रातली मुलगी पसंत करते. इतर क्षेत्रातल्या मुलांसाठी मुलींच्याकडून लेखात आधी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक अटी व शर्ती घातल्या जातात. आपल्या पसंतीचे स्थळ शोधून लग्न केल्यानंतरही मुलींच्या अपेक्षा कमी होताना दिसत नाहीत.
उच्च शिक्षण घेणाऱ्या कित्येक करीअर ओरिएंटेड मुलींना स्वयंपाक करता येत नाही. अगदी चहाही करता न येणाऱ्या अनेक मुली मी पाहिलेल्या आहेत. अर्थात स्वयंपाक, कपडे वा भांडी धुणे, घराची स्वच्छता यासारखी कामे त्यांना येत नाहीत म्हणून त्यांचे काहीच अडत नाही. त्यांचे काही अडणारही नाही हे खरे असले तरी मानवी मूल्ये जपण्यात या मुली जेव्हा कमी पडताना दिसतात तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते.
आपल्या कुटूंबाविषयी नवरा, बायको आणि आपली मुले इतकाच मर्यादित विचार करणाऱ्या या मुली कुटूंबसंस्थेच्या हेतूसोबतच मानवी मूल्यांनाही मोठा सुरुंग लावतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. घरातली इतर माणसे नाकारताना वृद्ध होत जाणारे आई-वडिल आणि लहान भावंडांचाही आपल्या नवऱ्याच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे, त्यांच्याप्रति त्याची काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आहेत याचा त्यांना सोईस्कर विसर पडतो. अशा घरांतले नातेसंबंध सुदृढ राहात नाहीत.
त्यांच्यात भावनिक आधाराची देवघेव होऊ शकत नाही. नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. हा तणाव अत्युच्च्य पातळीवरचा असेल तर हळूहळू नवरा-बायकोच्या नात्यावर त्याचा अनिष्ठ परिणाम होत रहातो.
“बदलत्या काळानुसार आमच्या पिढीतल्या मुलींच्या आवडी- निवडी व त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतील. कदाचित त्यामुळे या गोष्टी आमच्या पिढीतल्या मुलींच्या लक्षात येत नसतील, त्यांना त्यांचं नेमकं महत्त्व समजत नसेल; पण त्या मुलींच्या आई-वडिलांचं काय? त्यांना या गोष्टी कळत नाहीत का? अन् जर त्यांना हे कळत असेल तर ते आपल्या मुलींना समजावून का सांगत नाहीत? आपल्या मुलींच्या अवास्तव अपेक्षा ते का जोपासत आहेत?” असा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्नही त्या दिवशीच्या ऑनलाईन बैठकीत विचारण्यात आला होता.
मुलांनी बैठकीत नेमकेपणाने विचारलेला हा प्रश्न दुर्लक्ष करता येण्यासारखा नव्हता. कदाचित तुम्हा सर्व वाचकांनाही या प्रश्नानं कधीतरी घेरलेलं असु शकेल. हे असं का होतंय? हे जाणून घेण्याची वाचकांचीही उत्कट इच्छा असु शकेल.
आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने “मुलगा हाच वंशाचा दिवा आहे!” आणि “मुलगी हे परक्याचं धन आहे!” या दोन अतिशय चुकीच्या व अत्यंतिक गैर धारणांचा स्वीकार केला आणि तिथंच आपल्या समाजाचं सामाजिक गणित चुकलं आहे. या दोन्ही धारणांचा समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकार केल्यामुळे मुलींना गर्भातच मारलं जाऊ लागलं.
त्यासाठी कायदा मोडून, प्रसंगी अधिक पैसे खर्च करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ लागली. आईचा जीव धोक्यात घालून बाईचा जन्म थोपवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आला. समाजातलं लिंग गुणोत्तराचं प्रमाण बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी पिढ्या न् पिढ्या बिनदिक्कतपणे केल्या जाऊ लागल्या. परिणामी मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी होत गेली.
पूर्वी लग्नाळू मुलगा मुलगी पहायला जात असे. “मी चार मुली पाहिल्या.” इथपासून “मी चाळीस मुली पाहिल्या.” असं ही मुलं एकेकाळी अभिमानानं सांगायची. तेव्हा लिंग गुणोत्तर चांगलं होतं. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळं लग्नाळू मुलांना एक मुलगी पहायला मिळणंही दुरापास्त झालं आहे. आता मुलींकडे चॉईस आहे. निवड करण्याची संधी मुलींना आहे, मुलांना नाही! अशावेळी मुली स्वतःची सुख-सोय पाहणार नाही; तर दुसरं काय करतील?
इतक्या अनुकूल परिस्थितीत मुलीचे आई-वडिल तरी मुलांचा आणि समाजाचा कसा आणि काय म्हणून विचार करतील? आपली मुलगी अधिक सुखात रहावी अशी त्यांनी अपेक्षा केली, तर तिला गैर तरी कसं म्हणायचं? अगदी लग्नाला खोळंबलेल्या एखाद्या मुलाच्या बहिणीसाठी मुलगा शोधताना त्यांचीही अपेक्षा याहून वेगळी असणार नाही!
त्यामुळं लग्नाळू मुलींच्या अपेक्षा अवाजवी आणि अनाठायी आहेत असं म्हणणं योग्य आणि उपयोगाचं ठरणार नाही. लिंग गुणोत्तराचं प्रमाण सुधारणं, त्यासाठी मुलींचा जन्मदर वाढवित नेणं हाच या समस्येवरचा खराखुरा उपाय आहे. हे आपण समजून घेऊन तशी कृती करू तीच खऱ्या अर्थाने या प्रश्नाच्या सोडवणूकीची सुरुवात असेल!
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहिल्यानगर, संपर्क: 9766668295