Khandeshi lagna  खान्देशी लग्न संस्कृती

Khandeshi lagna  खान्देशी लग्न संस्कृती

गंगा जामुना दोन्ही खेते!

शब्दमाळ सजवणा-या, त्यात अनेक साहित्यरत्नांनी विविध साहित्याचे सुंदर सुंदर मणी ओवून  तिची शोभा शतगुणित करणाऱ्या शब्दप्रभूंना मानाचा मुजरा!

मागील महिन्यात तुळशीविवाह संपन्न होताच लग्नकार्याला प्रारंभ झालेला आहे. अलिकडे महाराष्ट्रानेही ईतर राज्यात असलेल्या प्रघाताप्रमाणे लग्नसोहळ्यचे एक नवीनच रूप, स्वरुप व प्रारूप स्वीकारलेले बघायला मिळते. पूर्वी लग्नाचा मुहुर्त ठरल्यावर एकाच दिवशी साखरपुडा, हळद, मेहंदीचा कार्यक्रम व्हायचा पण ती पद्धत आता जवळजवळ बादच झालेली दिसते.



नामशेष होत चाललेली दिसतेय, आता मेहंदी, हळद आणि तिसऱ्या दिवशी विवाह अशी एक नवीनच प्रथा सुरू झालेली आहे. ज्यला आपण ईव्हेंट साजरी करणे वगैरे म्हणतो तोच हा प्रकार आहे. मी आतापर्यंत नागपूर, कल्याण, अमळनेर येथील तांदळी व चाळीसगाव येथील दोन असे एकूण पाच विवाह सोहळे अगदी जवळून बघितलेत, अगदी जवळून न्याहळलेत. त्यातील तांदळी येथील लग्न बारा वाजून काही मिनिटांचे होते व तेथे आम्ही सकाळी आठ साडेआठच्या सुमारास पोचलो तेंव्हा कडाक्याच्या थंडीचा खूप प्रादुर्भाव जाणवल्यामुळे शेकोटी पेटवली गेली.


लग्नाची लगीनघाई वगैरेचा प्रकार तिथे न आढळल्यामुळे हे लग्न लागायला अर्थातच टाळी लागायला जवळपास दीड ते दोन नक्कीच वाजतील असा विचार करीत असताना धडधड पेटत्या शेकोटीत अर्धओली लाकडं टाकल्यावर ती ही लवकरच पेट घेत होती, ते पाहून न कळतच एक म्हण मनात पिंगा घालू लागली ती म्हणजे ‘वाळल्याबरोबर ओलेही जळते!’

मग काय अशा एकाहून एक पारंपरिक म्हणी मला आठवायला लागल्या. शेकोटी लवकर पेटावी म्हणून बारीक सारीक काड्याही उपयोगात आणल्या जात होत्या, मका काढून झाल्यावर निकामी झालेली कणसेही त्यात टाकली जात होती, त्यावेळी ‘काडी लावणे,’ ‘काड्या घालणे’, ‘हात शेकणे, ‘हात शेकून घेणे, ‘चूल पेटवणे’, ‘आग लावणे’, ‘आगीत तेल ओतणे’,

अशा म्हणी मला जसजशा आठवत गेल्या तसतशा त्या म्हणी मी त्या आचा-याला व नातलगांना सांगत सुटलो व अंग शेकता शेकता मौज मजा करु लागलो! मराठीसोबतच हिंदी भाषेतही अशाच म्हणी असल्याचे मी ईतरांना सांगत होतो, ‘आग बबूला होना’, ‘जलती हुयी आग में तेल डालना, ‘आगसे खेलना’, ‘पानीसे आग बुझाना’,  ‘आग लगाना’, ‘आंच ना लगने देना, ‘आँच न आने देना’, ‘गेहूँ के साथ सथ धूनभी पिसा जाना’,

Khandeshi lagna
Khandeshi lagna

या सोबतच अहिरानी भाषेतीलही म्हणी आठवत गेल्या’, ‘आग्काडी लाई दिन्ही’, ‘नको आग्काडी लावू’, ‘चेटाड रे तथा’, ‘दे चेटाडी’, ‘नीट नेम्मन हात शेकी ल्हिदात’, ‘ल्हे हात शेकी’, या माझ्या उपक्रमात माझे आप्तमित्रही सहभागी होत होते तसतशी आमच्या या गप्पांना रंगत येत होती. अशा या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची मजा घेतांना मी मात्र मस्त पैकी माझे ‘हात शेकून घेतले!

आचारी बुवा माझ्या या आग लावण्याच्या उपक्रमात सहभाग घेता घेता मोठ्या शिताफीने व अक्कलहुशारीने स्वयंपाक करण्यात रममाण झालेला होता, बघता बघता त्याने वरण व भात नीट शिजवून भाजीला फोडणी घालून स्वयंपाक तयारही केलेला दिसला. कढईतील उकळत्या पाण्यात तांदुळ टाकल्यावर सरोत्याने तो नीट उलटून पलटून घेत होता.

तांदुळ नीट शिजलेला आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी त्याच सरोत्यावर काही शिते घेऊन ती बोटांनी दाबून बघत होता व ईतरांनाही शहानिशा करुन घ्यायला सांगीत होता. त्यावेळी देखील मला एक म्हण सुचली, ‘असतील शिते, तर जमतील भुते’, ‘विना कारण चम्मच नको  घालू, ‘चाटू नको फिराऊ’, ‘खारं आल्नं दखी ले’, ‘चांगला हात धोई ल्हे’, ‘आस्ताई पस्ताई, खीर खाई मस्ताई’, ‘आई नका म्हना माले बाई नका म्हना, झाड खेटी म्हना माले मान मिठा वुना’, ज्या बाया लग्नात विनाकारण गोंधळ घालतात त्यांना ही म्हण चपखल लागू पडते

खानदेशातील लग्नकार्यातील सर्वात महत्वपूर्ण बाब जी आहे ती म्हणजे लग्नाच्या आधी जेवणाच्या पंगती बसवण्याची,
नवरदेव नवरी लग्नमंडपात येण्या आधीच साठ ते सत्तर टक्के वर्हाडी जेवण करून मोकळे होतात.

Khandeshi lagna
Khandeshi lagna

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरी नवरदेवा कडची मंडळी नवरी नवरदेवाला भेटवस्तुसोबतच टाक देतात, हा बहुतेक नगदी स्वरुपात असतो. आपापल्या मानमरातबाप्रमाणे, जास्तीत जास्त तीन हजार एक ते, एकशे एक रूपये अशी त्याची विभागणी असते. हे झाले ज्यांना मूळ लावलेले असते व मूळ पत्रिका दिलेल्या असतात त्यांच्याविषयी. बाकीचे कमीत कमी एकवीस, एक्कावन रुपये तरी वाजवतातच. कुणीही असे पैसे वाजविल्याशिवाय जेवत नाहीत!

मित्रहो! ही जी लग्नात ‘टाक’ देण्याची प्रथा आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त दोन ते अडीच लाख व कमीत कमी साठ ते सत्तरहजार रुपये गोळा होतात, लग्नकार्यात ज्यांचे देणे बाकी राहून गेले त्यासाठी याचा फार उपयोग होतो. काही मंडळी ही रक्कम नवरामुलगा व नवरीच्या नावे फिक्स डिपॉजिटमधे जमा करतात.  यात भेटवस्तु मी गृहीत धरलेल्या नाहीत, त्या वेगळ्याच असतात. नवा संसार उभारायला लागणारी भांडी-कुंडी व ईतर भेटवस्तुंची गोळाबेरीज जर केली, तर नवीन जोडप्याला साधा चहाचा चम्मचही विकत घ्यायची गरज पडत नाही.

या सत्कार्यातसुद्धा विघ्न घालणारे काही महाभाग असतातच.
नवरदेवाचा घोडा अडवून धरणे, सुक्याच्या मागणीनुसार रक्कम न मिळाल्यास हा पठ्ठा  घोड्यावरच ठाण मांडून बसतो तेंव्हा त्याला ,’बस कर रे भो! नको लगीनम्हा ईघन घालू! आसा काय करी र्हायना ‘लगीन मोड्याना मायेक’, येडानागत! बस कर आते उतर खाले!

अशाप्रकारे मी हे लग्न हळद, व विवाह एकाच दिवशी अन् ते ही साडेबाराला अगदी वेळेवर  टाळी लागून सर्वप्रकारचे विधी आटोपून नवरदेवासोबत नवरीला निरोप दिला तेंव्हा मोबाईलमध्ये वेळ बघितली असता साडेतीन वाजलेले होते, मघाचा तो चार पाचशे लोकांचा स्वयंपाक अवघ्या दीड ते दोन तासात तयार करुन माझ्या मनावर गारुड घालणारा आचारी एकटाच भांडी विसळत होता.



मी त्याच्या जवळ गेलो व त्याला शंभर रुपये बिदागी म्हणून, भेट म्हणून दिली पण तो, ती माझी प्रेमाची भेट घेईचना मग माझ्या नातलगांनी त्याला ती घेण्यास सांगितल्यावर मात्र त्याने माझी ती अल्पशी भेट स्विकारली. आसपासच्या पंचक्रोषित नावाजलेला हा आचारी अगदी निर्व्यसनी असल्यामुळेच मी बिदागी दिल्यावर त्याच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. तिकडे ते लग्नमंडपवाले गावातच सांयकाळी हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे मांडव काढण्यात गुंतलेले दिसले.

घरच्या नातेसंबंधातील आबालवृद्ध  मंडळींनी, खुर्च्या, सतरंज्या, गाद्यागिरद्यांची मोजदाद करुन नीट आवरून ठेवल्या. नवरीची आई तर चक्क झाडलोट करीत होती तिचा मुलगा व शेजारच्या आया बाया काहीना काही कामात गुंतलेल्या दिसल्या.  त्यावेळी नकळतच माझ्या तोंडून शब्द बाहेर पडलेत, ‘याले म्हन्तस आप्तमित्रसना गोतावळा आन सगासाई!’

आजच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाप्रसंगी बायांनी जी गाणी म्हटली ती मला फारशी आठवत नसली तरी ज्या ओळी आठवतात त्या लिहून थांबतो! लग्न गीते

गंगा जमुना दोन्ही खेते!
ईस्नू किस्नू कांड्या भरे!
रायरुखमिनी पोयतं धरे!
तठनं पोयतं कोन्ले आनं?
तठनं पोयतं शिवाजीले आनं
अजून बरंच काही!
चला बहिनीसहोन आते नाये ल्ह्या!

अवघ्या सात आठ तासात अगदी कुठलाही गडबड गोंधळ न होता संपन्न झालेला हा विवाह सोहळा मी आजन्म विसरणे केवळ अशक्यच!

शिवाजीआप्पा साळुंके
चाळीसगाव, जि. जळगाव.