एका स्वर्ग परीचीं लग्नकथा

एका स्वर्ग परीचीं लग्नकथा

नानाभाऊ माळी

                       ती अशीच चार चौघींसारखी!पण चार चौघींपेक्षा वेगळी!जन्म झाला तशी लाडकी लेक म्हणून तिचा सन्मान झाला!गौरव झाला!घरात आनंद झाला!तिची छोटी छोटी पावलं दुडू दुडू पळू लागलीं होती!पावलं मोठी होऊ लागली तशी घरातल्या वस्तूही इकडे तीकडे उचल ठेव करू लागली होती!घरात आजोबा-आजींची, आई-वडिलांची, काका,आत्यांची एकटीच लाडकी कन्या होती!सूर्य दररोज उगवत असतो!दिवस पळत असतात!प्रत्येक दिवस वेगळा असतो!दररोजचं सूर्यदर्शन वेगळं असतं!सकाळी सूर्य कधी अंधुकशा ढगा आड असतो!कधी नवा स्वच्छ कोवळा लाल गोळा वर येतांना दिसतं असतो!दररोजचीं अनुभूती वेगळी असतें!उगवत्याचे दर्शन दररोज नवं असतं!दिवसांगणिक परिस्थिती बदलत असतें!वेळ बदलत असतें!

एका स्वर्ग परीचीं लग्नकथा
एका स्वर्ग परीचीं लग्नकथा


     ती दिवसांगणिक निरागस,सुंदर कळी होऊन हुंदडत होती!तिचं बालमन घडत होतं!काही वर्षांनी काकांचंही लग्न झालं!काकू घरात आली होती!ती शाळेत जाऊ लागली!घर भरल्यासारखं वाटत होतं!घरात आनंद ओसंडून वाहात होता!आनंद वाऱ्यासारखा हुंदडत होता!येरझाऱ्या घालत होता!हळूहळू तीचीं पावलं शाळेकडे पळू लागली होती!शाळा संस्कार देत असतें!घर, कुटुंब ऊबदार सुरक्षा देत असतं!शाळा अन घर अशा दोन्ही अंगणात तिचं पळणं सुरू होतं!

लग्नकथा
एका स्वर्ग परीचीं लग्नकथा


             …..अन ऐके दिवशी तिच्या निर्मळ, निरागस,शालस, आरशासारख्या स्वच्छ बाल मनावर विधात्याने हळूच ओरखडा ओढला होता!घट्ट विणलेले धागे हळूहळू उसवून वेगळे झाले होतें!ममतेचा करकंचून बांधलेला घट्ट धागा उसवून हळूच वेगळा झाला होता!कुशीत घेऊन ममतेने गोंजारणं,लळा लावणं,हट्ट करून मागणं,सारं सारं दूर निघून गेलं होतं!आई नजरेआड गेली होती!नाते सोडून दूर गेली होती!आई नावाचीं कोमल ममता उबदार असतें!आईच्या कुशीत स्वर्ग विसावलेंला असतो!आईच्या कुशीत स्वतःचा हट्ट गाजवायचा असतो!हट्ट हक्कानें पूर्ण करायचा असतो!रागवायचं असतं!मनसोक्त वागायचं असतं! ती ममता उबेचा स्वर्ग अन स्वप्न पाहात होती!ती आई शोधत होती!आई नाते मागे ठेवून निघून गेली होती!दिवस जात राहिले!अंतरी झालेले ओरखडे हळूहळू खपली धरून दिसेनासे झाले होतें!ती मागचं सारं विसरून कुटुंबात एकजीव झाली होती!

              हक्क गाजवावा अशी आई प्रतिमा अस्पष्टशी होत गेली होती!ती पप्पा,चाचू-चाची अन आजी-आजोबांच्या गोधडीतं उब शोधतं होती!त्यांच्या गोधडीच्या उबेत एकरूप झाली होती!कोवळ्या बालमनाची मायेची भूक कौटुंबिक प्रेमातून पूर्ण करून घेत होती!त्यातून ममतेचा ओलावा अनुभवत होती!संतपणे वाहणाऱ्या आजी-चाचीच्या झऱ्यात खळखळून डुंबत होती!तिला लाड-प्रेम सर्व मिळत गेलं!आईची प्रतिमा अंधुकशी होत गेली होती!पप्पांचं दुसरं लग्न करून देण्यासाठी आग्रह होतं राहिला!पप्पा नकार देत राहिले!आता घरात तिला अजून एक बहीण आली होती!चाचू-चाचीनां मुलगी झाली होती!तिच्याशी खेळणे, तिला सांभाळणे,शाळेत जात आनंद घेणे हाचं तिचा रोजचा उपक्रम झाला होता!तिचं बलमन हळूहळू समजुतदार होऊ लागलं होत!तिला समज येत होती!पूढे माध्यमिक शाळेचीं पायरी चढली!शाळा छान होती!

लग्नकथा
एका स्वर्ग परीचीं लग्नकथा



ती दिसायला सुंदर परी होती!डिट्टो मम्मी-पप्पांची कॉपीचं जणू!चेहरा अगदी आई सारखा,उंची पप्पांसारखी!दोघांचं उत्तम मिश्रण,रसायन होती!पुढे पप्पा तिचे आई झाले होतें!चाची आई झाली होती!चाचू आई झाले होतें!तरीही पप्पा आतून पोखरत गेलें होतें!पोखरत राहिले!नवीन लग्नाला नकार देत राहिले!ती काहीही बोलली नाही!कदाचित सावत्र आईचीं पप्पांना भीती होती का? सावत्र आई आली असती तर लेकीवर अन्याय होईल म्हणून लग्नाचा विचार मनातून झटकून टाकला होता!लेकीचा  स्वभाव सरळमार्गी असा!काही वर्षातून घरात अजून एक पाहुणा अवतरला होता!काकांना मुलगा झाला होता!चाचू -चाचीला मुलगा झाला होता!दोघी बहिणीला भाऊ मिळाला होता!घर आनंदी होतं!ती ही आनंदी होती!ती पप्पा,चाचू-चाची अन आजोबा-आजीचीं ममताशाल पांघरून शाळेत जात होती!घरातली सर्वात मोठी मुलगी म्हणून चाचीला घरातल्या कामात मदत करू लागली होती!अभ्यास करीत मॅट्रिकपर्यंत पोहचली होती!मार्चमध्ये परीक्षा होती!अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षा दिली!मुळातचं हुशार असल्यामुळे ती उत्तम गुणांनी एस. एस.सी,मॅट्रिक उत्तीर्ण झाली!पुढे अशीच बारावी सायन्स देखील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली!घरात तिचा अभिमान वाटू लागला होता!तिला आतून आनंद होत असे!एक एक वर्षं पुढे सरकत राहिली!लहान बहीण सातवीपर्यंत तर भाऊ पहिलीला जाऊ लागला होता!



                     कालचक्र माणसाला आपल्याचं ठेक्यावर फिरवीत असतं!नाचवत असतं!त्यातून सावरत माणूसपण जगायचं असतं!माणसाला एकदाच जन्म  मिळतो!मिळाल्या जन्माचं सार्थक करायचं असतं!जन्म चंदनस्पर्शी करायचा असतो!तशी धडपड करायची असतें!सत्कार्माचा सुगंध पसरवीत स्वतःचं नाव सत्कारणी लावायचं असतं! *ती* झिजत होती!सर्वांच्या तोंडी हुशार, कष्टाळू, घराची शान वाढवणारी मुलगी म्हणून नाव निघत गेलं!पुढे बी.एससी देखील अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली!

        एम.एससी करीत असतांना अचानक तिच्या मनावर प्रचंड मोठा आघात झाला!तिचे लाडके पप्पा!तिच्या जन्मदात्याचं अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं होत!हा आघात तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा होता!असहनीय होता!बालपणी आई दूर गेली!घटस्फोट झाला!कळतं नव्हतं!आई दिसतं नसल्याचं दुःख पचवतं मोठी झालेली, ती पिता गेल्याने कोलमडून पडणार अशी अवस्था होती!त्यातूनही स्वत: सावरत,हिम्मत देत कुटुंबातील इतरांना आधार देत होती!स्वतःच्या अश्रुंनां बांध घालत हंबरडा फोडून रडणाऱ्या आजोबा आजींना, चाचू -चाचीनां, दोघे लहान बहीण भावंडांना आधार देत होती!धीर देत होती!स्वतः आतून खचून गेलेंली असतांना संयमी राहून सर्वांचे अश्रू पुसीत होती!घरातील ती मुलगी नसून जबाबदार पुरुषासारखी भूमिका बजावीत होती!वडील गेल्याचं स्वतः दुःख पचवून उभी होती!

                       दुःखानें एखाद्याच्या पाठीमागे तरी किती पाठलाग करावा बरं?काही मर्यादा असावी की नाही?आई नाही!वडील गेलें!पण ती वडलांची जागा भरून काढीत होती!कुटुंबालां आधार देत होती!हेचं खरं जगणं असतं!हेचं जीवनाचं सात्विक सत्य असतं!जगणं दुसऱ्यांसाठी असतं!दुःखाचा पहाड अंगावर असतांना इतरांच्या अंगावरील पडलेला पाहाडाची माती उकरत त्यानां बाहेर काढणारी, सांत्वन करणारी खरा अर्थ सांगणारी ही मुलगी मनाने खंबीर झाली होती!ती किती किती मोठी झाली होती?कमी वयात जगणं आणि जगवीणं शिकली होती!संयमाने स्वतःस अश्रुंचा बांध घालणारी ती घराची दिदी झाली होती!

             कधीकधी अतिपाठलाग करून दुःख मागे लागतं असतं!पिच्छा पुरवीत असतं!अचानक आलेल्या वादळात सर्व कोलमडून पडावं, हिरावून न्यावं, सर्व विस्कटून जावं असं असतं!खरचं आपलं जीवन पराधीन आहे का? दुःखावर दुःख कोसळत असतं!तोंड देता देता त्यातून बाहेर पडावं!वडील देवाघरी गेल्याच्या दुःखावर थोडी खपली येतं होती!सावरून उभे राहात होती!घरच्यांना आधार देत असतांना पुन्हा अवघ्या तीन महिन्यातंचं तिचा लाडका एकटाच लहान भाऊ, सातवीत शिकणारा गोंडस राजकुमार,चाचुंचा मुलगा गंभीर तापाने फनफननू लागला!त्याला दवाखान्यात नेलं!तेथेच त्यानें शेवटचा श्वास घेतला!अचानक देवाघरी निघून गेला!घरातला सगळ्यात लहान गोड,गोंडस,कोवळा राजकुमारास नियतीने हिरावून नेलं चाचू-चाची अक्षरशः कोलमडून पडले होतें!

लग्नकथा
एका स्वर्ग परीचीं लग्नकथा


कुटुंबावर कोसळलेले हे सर्वात मोठे दुःख होतं!तो आघात डोळ्यातून अश्रुंचा पूर काढीत राहिला!संपूर्ण कुटुंब दुःखाच्या खोल खोल खायीत जाऊन पडलं होतं!कुणाला सांभाळावं? दुःखाच्या वेदनांनी झाड उन्मळून पडावं असं होतं!हृदय काढून न्यावं असं अनावर होतं!आघातांच्या मालिकेने अवघ कुटुंब कोलमडून पडलेलं असतांना! ती ती दुःख गिळत उभी राहिली!कुटुंबाची आजी झाली!आजोबा झाली!वडील झाली!आई झाली!चाचू चाची होऊन स्वतः उभी राहायली!स्वतःचे अश्रू लपवीत सर्वांचे अश्रू पुसत राहिली!ती कुटुंबाची आधार झाली!सर्वांच्या अश्रूनीं तिचा खांदा  भिजतं राहिला!तिचं हृदय अश्रूनीं भिजत होतं!तिचं दुःख कुणाला सांगणार होती?इतक्या कमी वयात किती मोठी झाली होती ?ती कुटुंबाचीं लाडकी लेक होता होता मातृहृदयी आजी झाली होती!इतरांच्या जगण्याचा आदर्श झाली होती!

       काळ पळत असतो!मानवी मन चढ उतारांच्या झूल्यावर अधांतरी पुढे मागे होतं असतं!आपण झूल्यावर बसावं!पूढील अंधार माहीत नसतो!उजेड माहीत नसतो!उगवत्या नव सूर्यदेवाचे पूजन करून स्वागत करीत राहायचं!घर उभं राहात असतांना अतिशय गोड, आनंदी बातमी मिळाली होती!तिची लाडकी बहीण, चाचूची मुलगी एस.एस.सी बोर्ड, मॅट्रिक परीक्षेत ९७% मार्क्स मिळवून संपूर्ण शाळेत पहिली आली होती!खूप अभिमानाची, गौरवाचीं गगनंदाचीं आनंदाची गोड बातमी  घडली होती!अन ती देखील ती स्वतः एम.एससीमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली होती!पर्वताएवढ्या दुःखावर छोट्या आनंदाने विजय मिळवला होता!डोक्यावरचा तप्त सूर्य आग ओकून थकला होता!त्यानें तरी किती परीक्षा घ्यावी? परीक्षा घेऊन झाली होती!हळूहळू चौफेर शीतल शिडकावा होतं होता!आनंदझुला हलत होता!कित्येक दिवसांनी सर्वचं आनंदात होतें!आजोबा आजी, चाचू-चाचूची लाडकी *ती* सुद्धा आनंदात होती…

            नात्यातलचं लग्नाचं एक स्थळ तिच्यासाठी आलं होतं!सर्वांना या प्रसंगाने आनंदी केलं होतं!तीचं शिक्षण एम.एससी तर नवऱ्या मुलाचं शिक्षण एम.एससी, पी.एच डी होतं!किती सुरेख लक्ष्मी नारायणाचा जोडा जमला होता!तिला स्वप्नातला राजकुमार भेटला होता!ती स्वर्गस्वप्न राजकुमारी होती!झाडून सर्व छत्तीस गुण जुळून आले होतें!पसंती झाली!चालता बोलता लग्नाचा मंगलमय दिवस उजाडला!आनंद दिवस उजाडला होता!आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी “ती” राजकुमारी,स्वप्नातली “ती”सुंदर परी!हळद लावून माहेर सासरच्या उत्तम संस्कारांनी मांगलीक विवाह वेदिवर उभी राह्यली!पवित्र मंगलाष्टक कानी पडत होतें!अन एक आश्चर्य देखील घडलं होतं!तिची जन्मदेती आई!जी लग्नानंतर दुसऱ्या गावी राहते!ती देखील अक्षता हाती घेऊन उभी होती!हा योगायोग म्हणावा का?घडलेला आनंदी क्षण होता!मंगल ध्वनी पावित्र्याच्या देव गाभाऱ्यात पोहचतं होता!अग्निसाक्ष सप्तपदी पार पडतं होती!नवरदेवानें पवित्र मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधलं तशी माहेरची ही गोजिरवाणी लेक!एक स्वप्नपरी सासरची झाली होती! ती आनंदी होती!माहेरचे अनंत अश्रू डोळ्यात तरळत होतें!प्राजक्त फुलांसारखी सुगंध सांडत वेगळ्या गोतावळ्यात विवाह संस्कारांनी बांधली गेली होती!ती सौभाग्यवती झाली होती!तिच्या नावामागे नवऱ्याचे नाव जोडले गेलें होतें!लौकिकार्थाने ती परकी झाली होती!लोकसाक्षी नव्या नात्यांशी बांधली गेली होती!सासरची झाली होती!आजोबा आजी, चाचू-चाची, लाडकी बहीण आनंदी होतें!माहेरी लावलेल्या रोपाने दुसऱ्या दारीं गगन भरारी घेतली होती!आजवर वाढवलेली लाडकी गोड परी सासरी निघून गेली!सर्वांच्या डोळ्यात हळव्या अश्रूचीं गर्दी होती!अश्रुंचा आनंदतलाव डोळ्यात शिगोशिग भरून कोपऱ्याच्या कडेने वाहू लागला होता!एक परी जन्माने माहेरी फुलली,बागडली!लग्न होऊन दुसऱ्या घरी निघूनही गेली!जाता जाता माहेरवाशीनचां सुगंधी प्राजक्त सांडून गेली!संस्कार सडा सांडून गेली!सर्वांना जगण्याचा जीवनार्थ सांगून गेली!परी सर्वांना हळव्या आनंदाश्रुत भिजवून नजरेआड झाली!कर्तव्यपूर्तीचं स्वर्गीय सुख वेगळंच असतं सांगून गेली !

नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
(आज नरडाणा,जि.धुळे येथे)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१६ फेब्रुवारी २०२५