लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईसाठी काही विचार
लग्नाचा वयाच्या मुली
लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईसाठी काही विचार
सध्याच्या काळात वैवाहिक जीवन तणावग्रस्त होत चालले आहे. नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत. आपल्या करिअरला, विचारांना महत्त्व देत असताना, अनेकदा नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि परिणामी, घटस्फोटाचे प्रमाणही वाढत आहे. अशा स्थितीत मुलीच्या लग्नाचा विचार करताना, तिच्या आईच्या मनात असंख्य शंका, धास्ती आणि काळजी असते.
आज मी एक अशीच आई म्हणून माझ्या लाडक्या लेकीला, जी लवकरच सासरची सून होणार आहे, काही विचार सांगू इच्छिते.
माझ्या लाडक्या लेकीला
प्रिय लेक,
गोड पापा आणि आशीर्वाद. तु लवकरच माहेरची लेक, सासरची सून होणार आहेस. या नवीन प्रवासासाठी तुला मनापासून शुभेच्छा आणि काही खास गुजगोष्टी सांगायच्यात.
विवाह म्हणजे केवळ पती-पत्नीचं नातं नाही, तर दोन कुटुंबांच्या जोडलेल्या नात्यांचा महत्त्वाचा धागा आहे. लग्नाच्या वेळी ज्या दिवशी तु उंबरठा ओलांडून नव्या घरात पाऊल टाकशील, तो तुझ्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू होईल. या प्रवासाला सुरुवात करताना, पहिलं पाऊल विश्वासाने टाकावं. एक गोष्ट लक्षात ठेव—तडजोड हे संसाराच्या यशाचं मूळ असतं.
तडजोड केली की, नाती आणखी घट्ट होतात. दुसऱ्याला आनंद दिला की, तो आनंद आपल्याकडेच परततो, हे नेहमी लक्षात ठेव.
विवाह यशस्वी होण्यासाठी काय करावे?
विवाह यशस्वी होण्यासाठी फक्त योग्य जोडीदार मिळवणं महत्त्वाचं नसतं, तर त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः योग्य जीवनसाथी बनणं. संसार सुखाचा करण्यासाठी, दोघांनीही एकमेकांचा साथीदार होणं आवश्यक आहे. हट्टीपणाऐवजी, एकमेकांच्या मतांना आदर द्या आणि तडजोड स्वीकारा.
संवादाचा सेतू
मोबाईल, सोशल मीडिया, चॅटिंगपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न कर. त्याऐवजी घरातल्या लोकांशी संवाद साध. संवादाची कला साधली की, घरातील नाती आणखी घट्ट होतात. फावल्या वेळात मला फोन करण्यापेक्षा सासूबाईंशी संवाद साध. लहान लहान गोष्टी मला फोनवर सांगण्यापेक्षा, त्यांच्या सल्ल्याने मार्ग काढ. सासुबाईंचं अनुभवाचं देणं, त्यांचं मार्गदर्शन तुला पुढच्या वाटचालीत नक्कीच उपयोगी पडेल.
माझा एक सल्ला
तुझ्या नवऱ्याशी आणि कुटुंबाशी एक घट्ट नातं जोडताना, त्या घराच्या संस्कारांना, सवयींना आदर दे. आदर, प्रेम आणि आपुलकीने वागलं की, तुझं घर, तुझी जागा, तुझा आदर निश्चितच वाढेल.
शेवटी…
मी तुझी आई आहे, म्हणून माझं मन तुझ्यासाठी सदैव चिंतेत राहील. पण माझे अनुभव, माझं प्रेम आणि आशीर्वाद तुला या नव्या प्रवासात पाठबळ देतील. तू दोन्ही घराण्यांचं नाव उज्ज्वल करशील, भरभराटीला आणशील याची मला खात्री आहे.
आणि हे पत्र—मोबाईलमधील मेसेजसारखं कधी डिलीट होणार नाही, तुझ्या आयुष्यात कायमचं मार्गदर्शक असेल.
तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम!
तुझीच,
आई
हा पत्रप्रपंच वाचून सध्या लग्नाचं वय झालेल्या मुलींच्या आईंनी देखील विचार करावा, मुलीला मार्गदर्शन करावं आणि तिच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा द्याव्यात. बदलत्या काळात देखील नाती टिकवण्याचं, प्रेमाने आणि संयमाने संसाराचा गाडा चालवण्याचं तत्त्व कधीच बदलणार नाही, याची जाणीव ठेवणं महत्त्वाचं आहे.
1 thought on “लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईसाठी काही विचार”