प्री-वेडिंग फ़ोटो शूट वर बंदी वेळेवर लग्न लावणे गरजेचे!
प्री-वेडिंग फ़ोटो शूट
प्री-वेडिंग फोटो शुटवर बंदी वेळेवर लग्न लावणे गरजेचे!
बदलत्या काळात आणि आधुनिक युगात सामाजिक, सांस्कृतिक, पारंपारिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. विवाह संस्कार हा ‘सोळा संस्कारां’मधील एक संस्कार. परंतू यातसुध्दा काळानुरूप मोठ्या प्रमाणावर अनावश्यक ‘बदल’ झाले आहेत.
![प्री-वेडिंग फ़ोटो शूट वर बंदी वेळेवर लग्न लावणे गरजेचे! 2 प्री-वेडिंग फ़ोटो शूट](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2023/09/team-building-3669907_1280-1.jpg?resize=698%2C1024&ssl=1)
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि यातील ऋुतूमानावर कृषि क्षेत्र अवलंबून असून त्या पध्दतीने पिके घेतली जातात.
अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि या काळात साजरे होणारे सण कृषि व्यवस्थेशी निगडित असेच आहेत. पोळा, दिवाळी, दसरा आणि यानंतर सुरू होणारा विवाह सोहळ्यांचा काळ. जो तुलसी विवाहापासून तर जून महिन्यापर्यंत सुरू असतो. एके काळी जूनमध्ये वेळेवर पावसाळा सुरू होत असल्याने मे महिन्यापर्यंत लग्न सोहळ्यांचे आयोजन होत असे.
त्या काळात लग्न सोहळ्यामध्ये मंडपापासून ते जेवणावळीतील पदार्थांपर्यंत साधेपणा होता. गुरव वाद्य, बॅण्डसारखी वाद्ये होती. मंगल कार्यालये, डी. जे. सारखी वाद्ये असे प्रकार नव्हते. हाताला अत्तर लावून, गुलाबदाणीने पाहुण्यांच्या अंगावर सुगंधीत गुलाबजल शिंपडणे, लग्न मंडपात पान-सुपारीची तबके ठेवणे, ओरडून आहेर लग्न मंडपात वाजवणे असे मानापानाचे प्रकार होते. ‘स्टॅण्डर्ड टाईम’ म्हणजे दिवसा लग्न लावली जात नसत तर गोरज मुहूर्तावर लग्न लागत होती.
साधारणपणे दोन दिवस लग्नसोहळा चालायचा. मुलीचे वय आणि मुलाचे वय किती यावर विशेष चर्चा नसायची. 12-14 वर्षांची मुलगी आणि 16 ते 18 वर्षांचा मुलगा असे साधारपणे वयोमान असायचे. शिक्षण आणि नोकरी यावर चर्चा नव्हती तर शेती किती आहे, गोठ्यात बैलजोडी, गायी, म्हशी असतील तर ‘सधन’ शेतकरी म्हूणन त्या घरी मुली दिल्या जायच्या.
आज देशात मुलींच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आयटी इंजिनिअर, वैद्यकीय क्षेत्रासह, बँकिंग, एअरफोर्स, सेना दल, प्रशासकीय अधिकारी, अशा जवळपास सर्वच क्षेत्रात तरूणींनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मुलांसोबत – मुलींचे शिक्षण पाहून विवाह संबंध ठरायला लागले आहेत.
विशेष म्हणजे विवाहाच्या वयासंदर्भात देखील कायदे झाले आहेत. मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 पेक्षा कमी असू नये असा कायदा करण्यात आला आहे. असे असले तरी एकीकडे शिक्षणामुळे मुला-मुलींचे वय लग्नाच्यावेळी 25 ते 30 च्या दरम्यान असते. परंतु दुसरीकडे आजही मुलींच्या बालविवाहांची संख्या भारतात दरवर्षी 15 लाखांपेक्षा जास्त आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात एका वर्षात दहा हाजरापेक्षा जास्त बालविवाह झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे.
महाराष्ट्रातील अनेक समाजासह राजस्थानमध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठे आहे. असो. अशा या आयुष्याची सुरूवात करण्याच्या मंगल सोहळ्यात आमुलाग्र बदल काळानुरूप झाले आहेत. समुद्रात, विमानात, हेलीकॉप्टरमध्ये विवाहाच्या बातम्या आपण अधुन-मधुन बघत असतो. कोरोना काळात ऑनलाईन विवाह झालेत. डिजिटल मॅरेजपासून थ्रीस्टार, फाईव्ह स्टाार ‘कल्चर’ विवाह सोहळ्यांसाठी वापरले जाते आहे.
लग्न समारंभात संगीत पार्टीसह मुंबई-पुण्यातील सुप्रसिध्द डान्सर, कमांन्डो, रोषणाई, शहनाई, विमानाने पुष्पवृष्टी, राजस्थान, जम्मू-काश्मीर येेथे प्री-वेडिंग फोटो शुटींग, जेवणावळीत किमान शंभर ते दीडशे पदार्थ, पन्नासच्यावर मिठाई अशा अनेक प्रकारांनी लग्न समारंभ पार पाडले जात आहेत. सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, हिरे जडित दागिने, भरजरी साड्या, पैठणी, हजारो-लाखो रूपयांचा नवरदेवाचा सुट, आहेर म्हणून दिल्या जाणार्या साड्या, भव्य मंगल कार्यालय, सिनेस्टाईल असे मंडप डेकोरेशन सेट, वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे.
भाऊबंदीकीला बोलावून रात्री लोखंडी खुट्या मारून दोर बांधून मंडप बांधण्याची प्रथा पूर्ण बंद झालेली आहे. सामान्य लग्नात देखील किमान दहा पदार्थ बनविले जातात. आता लग्नात नातेवाईकांपेक्षा राजकीय मंडळींना बोलावण्याची नवी ‘फॅशन’ सुरू झाली असून जवळचे नातेवाईक ‘लांब’ बसतात आणि राजकीय मंडळींचे ‘सत्कार’ केले जातात.
‘मी’ किती मोठा माणूस हे दाखविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. वर्हाडी मंडळींना भेट देण्याची प्रथा काही समाजामध्ये आधीपासून आहे. परंतू आता महिलांसाठी विशेष मुळपत्रिका देऊन किमान पाचशे ते हजार महिलांना निमंत्रण देण्याची नवी पध्दत सुरू झाली आहे. लग्न समारंभात किमान पाच प्रकारची वाजंत्री, पाच पंडित असावे असा ‘पायंडा’ पडतो आहे. आणि यात सामान्य नोकरदार माणूस, शेतकरी भरडला जातो आहे.
कर्ज काढणे, शेत विकणे, शेती गहाण ठेवली जाते, परंतू आपली ‘मुछ’ कशी ‘कडक’ राहील यावर खोटा ‘दिखाऊपणा’ मिरविण्याची स्पर्धा लागली आहे. या सर्व गदारोळात आता काही समाजांनी त्यातून बाहेर पडण्यासाठी समाजाच्या बैठका घेवून अनेक ‘निर्बंध’ लावण्याचे अभिनंदनीय प्रकार सुरू झाले आहेत. शहादा तालुक्यात गुर्जर समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. या समाजात खुप आधीपासून सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुर्जर समाजाने खुप चांगले आणि अभिनंदनीय निर्णय घेतले आहेत.
वेळेवर लग्न लावणे
वेळेवर लग्न लावणे, लग्न समारंभातील आडंबर यावर त्यांनी कटाक्षाने बंदी घातली आहे. तशाच प्रकारचा निर्णय शहादा येथील गुरव समाजाने देखील घेतला. या समाजाने प्री-वेडिंग फोटो शुटींगवर पूर्णपणे बंदी घातली असून विवाहाच्या आधी अशा प्रकारेच प्रदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाश्चात्य संस्कृतीचे ‘फाजील चाळे’ भारतीय संस्कृतीत शोभत नाही, हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे.
परंतू अधांनुकरणाच्या नावाखाली सर्व प्रकार सामान्य कुटूंबामध्ये देखील सुरू झाले आहेत. कॅमेरा आणि फोटो अल्बमचे बिल दोन लाखांपासून दहा लाखांच्या घरात जातात. आणि महत्वाची बाब म्हणजे धावपळीच्या या युगात हे लग्न समारंभ कधीही वेळेवर सुरू होत नाही. बोलावलेली पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, मित्र परिवार येवून थांबलेले असतात, लग्न लावल्याशिवाय जाता येत नाही.
परंतू आलेल्या पाहुण्यांना वेठीस धरून खुप उशिराने लग्न लावण्याची पध्दत अलिकडच्या काळात सुरू झाली आहे. लग्न वेळेवर लागत नाहीत म्हणून मंडपात बसलेली मंडळी नाराज होवून बसलेली असतात. अनेक कामे असतांना देखील उठून जाता येत नाही. त्यामुळे वेळेवर लग्न लावण्याचा देखील ‘निर्धार’ या गुरव समाजाने घेतला आहे.
या राज्यातील सर्व समाजांनी लग्न समारंभासाठी समाजाला पूरक ठरतील अशा बाबींवर महत्वपूर्ण ठोस ‘निर्णय’ घेण्याची आजच्या काळाची गरज आहे. लग्नावर होणारा अनावश्यक खर्च, प्री-वेडिंग फोटो शुटींग, हुंडा आणि वेळेचे भान ठेवले तर समाजांचा ‘विकास’ झाल्याशिवाय राहणार नाही. तूर्तास एव्हढेच …!
3 thoughts on “प्री-वेडिंग फ़ोटो शूट वर बंदी वेळेवर लग्न लावणे गरजेचे!”