मराठा समाजाचा विवाह पध्दत बदलण्याचा परिवर्तनशील निर्णय

मराठा समाजाचे परिवर्तनशील निर्णय

पूर्वीच्या आणि आताच्या विवाह पध्दतीत खूप फरक आहे. पूर्वी दूरवर जाणे, येणे शक्य नसल्याने मुला-मुलींचे विवाह पंचक्रोशीतच होत असत. बैल गाड्यांचा प्रवास होता. त्यामुळे वन्हाड आटोपशीर असायचे. परिणामी मुलीकडे नवरदेवाला घेऊन जायचे असले तरी मुलींच्या पालकांना फार चिंता नसायची. व्यवस्थापन सोपे जाते असे. जेवणावळी होत्या पण आचारींचे काहीच काम नसे. गावातील भाऊबंदकीतील आया बहिणी व पुरूष अंग झटकून कामाला लागत आणि विवाह पार पाडत असे.

खुशालीचे पोस्टकार्ड येत असे आठ दिवसानंतर मुलगी सासरी पोहोचल्याचे पत्र येत असे. तरीही आई वडिलांना घाई नव्हती. पत्राचा आनंद काही और असायचा. पुढे एसटीच्या बसेस प्रासंगिक करारावर उपलब्ध होऊ लागल्या त्यामुळे सोयरिकचा आवाका वाढला. दूरच्या जिल्ह्यातील पसंतीच्या मुली मिळू लागल्या, शिक्षण गावात जेवढे असेल तेवढेच होत असे. अपवाद म्हणून काही मुली त्यांच्या सोईनुसार उच्च शिक्षणासाठी शहरी जाऊ लागल्या. पुढे शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी विवाहाचे खर्च आवाक्यात असायचे, कारण साधेपणाने बहुतेक विवाह होत असत.

मुलींना पैसे देण्याची वेळ

देणे घेणे पूर्वी होते तसे आजही आहे. पण त्यात एक आश्चर्यकारक बदल झाला. मधल्या काळात मुलीचा विवाह म्हणजे कर्जबाजारी होऊन आयुष्यभर ते फेडत राहणे बापांच्या नशिबी होते. आता मुली शिकल्या, त्यांच्या पसंत्या बदलल्या. शिवाय प्रमाण कमी झाले. परिणामी मुलींना पैसे देण्याची वेळ आली आहे.

घटस्फोटाचे प्रमाण वाढले

पत्र इतिहास जमा झाले. फोन आले, नंतर मोबाईल आले. दृश्य प्रणालीतून संवाद होऊ लागले. आई रोजच मुलीकडून हालहवाल घेऊ लागली. घरातला हस्तक्षेप वाढला. तसे मानसिक अंतरही वाढले. घटस्फोट होऊ लागले. शिवाय लभातल्या पसंती वाढल्या. सोने, कार, किमान मोटार सायकल आली. टिव्ही, फ्रिज, एसी आले. फटाके, आतिषचाजी, डिजे, भव्यता आली त्यात अनेकांच्या इस्टेटी पणाला लागल्या. एवढे करूनही समाधान नावाची गोष्टच नाही. वाद विवाद, मागणी, चंगळ हे सगळे डोईजड जाऊ लागले आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढले.याचा अर्थ असा की, शिकले, सवरले, तरी समज काही आली नाही. त्यामुळे प्रत्येक समाजात नव्या समस्या निर्माण झाल्या.

मराठा समाजात समस्या अधिक

तुलनेत मराठा समाजात समस्या अधिक आहेत.वधूवर मेळावे होतात पण होतकरू मुलांना देखील मुली मिळत नाहीत. कारण मुलींचे चॉईस बदलले आहेत. नोकरी हवी, ती नाशिक, मुंबई, पुण्याकडे हवी. शेतीशी काहीच संबंध येत नाही. शेत कुठे आहे तेही माहीत नाही तरी शेती हवीच अशा अटी येऊ लागल्या आहेत.

मराठा सेवा संघाच्या वधूवर मेळाव्यात सर्व संमतीने ठराव मंजूर

यातूनही विवाह जुळलाच तर त्यातील बडेजावात गफल्लक होण्याची वेळ यावी इतका खर्च असतो.या सर्व परिस्थितीचा विचार मराठा सेवा संघातील प्रमुख कार्यकत्यांना सताऊ लागला. त्यातून मंथन झाले आणि काही नियम मराठा सेवा संघाने वधूवर मेळाव्यात सर्व संमतीने मंजूर केले ते अतिशय पुरोगामी स्वरूपाचे असून समाजाला परिवर्तनाकडे घेऊन जाणारे आहेत. उशिरा का असेना विवाहासंबंधीचे काही नियम या समाजाने बनविले ही बाब स्वागतार्ह आहे आणी काळाची ती गरज आहे.

गेल्या काही वर्षापासून विवाहपूर्व शुटींग किंवा फोटोसेशनचा हव्यास वाढला असून तो फार खर्चिक आहे. त्याचा उपयोग होत नाही कारण लगेचच विवाहाचे शुटिंग व फोटो सेशन होते. तेही महागडे असते. अल्वंम आणि सीडीज एकदाही कोणी पुरेपूर बघत नाही. तरीही त्याचा आग्रह असतोच. तो बंद करावा असा ठराव करण्यात आला आहे.

वैदिक किंवा नेहमीच्या विवाह पध्दतीपैकी कोणतीही एकच पध्दत अवलंबावी, दोन्ही तिन्ही नकोत, त्या अनाठायी आहेत. विवाह पूर्व मेहंदी, संगीत, हळद हे घरातल्या घरात करावयाचे विधी असून त्याचे सार्वजनिकीकरण करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यात अनावश्यक वेळ व पैसा खर्च होतो. शिवाय हे उपक्रम तीन चार दिवस चालतात ते बंद करावेत.

अहेर देणे, घेणे मूळ लावणे, प्रत्यक्ष जाऊन पत्रिका वाटप करणे बंद करावे, फटाके, आतिषबाजी, कर्णकर्कश डिजे वाजविणे बंद करण्यात यावे. अन्नाची नासाडी थांबवावी, तांदुळाच्या अक्षतां ऐवजी फुलांच्या पाकळ्या वापराव्यात किंवा फक्त टाळ्या वाजवाव्यात. भोजनात मोजकेच पदार्थ ठेवावेत.

विवाहानंतर घटस्फोटांचे प्रमाण वाढलेले आहे. ते कमी करण्यासाठी मराठा सेवा संघाने समुपदेशन कक्ष सुरू केला त्याची मदत घ्यावी व घटस्फोट थांबविण्याचा प्रयत्न करावा.

अशा प्रकारचे काही ठराव धुळ्यातील वधू वर संमेलनाच्या वेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत. सर्वांची या नियमांना मान्यता आहे म्हणजे ते सर्व सगळ्यांच्या फायद्याचे आहेत. असे गृहीत धरण्यास हरकत नसावी तसेच त्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील सर्वांची आहे. याची जाण ठेवणे गरजेचे आहे.

एकूणच मराठा समाजात वाढलेल्या महत्वाकांक्षा, अनावश्यक शक्ती प्रदर्शन, प्रतिष्ठेचे प्रदर्शन, ह्या बाबी सर्व सामान्य लोकांना शक्य नाहीत. म्हणून विवाह जुळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातून समाजाला बाहेर काढायचे असेल तर नव्या वाटा, बंधने, नियम, संयम या बाबींचा अवलंब करावाच लागेल. त्या शिवाय पर्याय नाही. त्या संदर्भात समाजाने नियम तयार करण्याचे पुरोगामी पाऊल टाकले ते अभिनंदनीय म्हणावे लागेल. त्यासाठी सर्व पदाधिका-यांचे आम्ही अभिनंदन करतो. हळूहळू सर्वच समाजांनी या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द होणे गरजेचे आहे.

गुर्जर समाजाचा पॅटर्न

शहादा, नंदुरबार व गुर्जर समाजाचे अस्तित्व असलेल्या तळोदा, शिरपूर तालुक्यातील गुर्जर समाजाने पंचवीस तीस वर्षापूर्वी अतिशय परिवर्तनशील निर्णय घेतले. त्याची काटेकोर अंमलबजावणी होते. त्यासाठी गावागावात समित्या आहेत. कोणी प्रमाद केल्यास दरवर्षी प्रकाशा येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्याची निर्भत्सना होते. त्यामुळे कोणी चुकीचे करण्यास धजावत नाही. या नियमांचा परिणाम असा झाला की, गरीबा घरच्या होतकरू मुली संपन्न घरी जाऊ लागल्या. त्यांचे संसार सुखी संपन्न झाले. लप्रात करावयाच्या खर्चाची रकम हा समाज साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळास देणगी म्हणून देतो. महाराष्ट्रातील हा एकमेव आदर्श असावा. हंडा पूर्णपणे बंद आहे. मराठा समाजाने एकदा गुर्जर समाजाचा पॅटर्न समजून घ्यावा व पुढे आणखी पाऊले टाकावीत अशी अपेक्षा आहे.

लग्न सराई लेख आणी बातम्या

आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास

विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च अनिष्ट प्रथा रद्द

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी

What is marriage? लग्न लग्न म्हणने काय असतं ?

फरार झालेल्या नवरदेवाला पोलिसांनी परत आणुन लग्न लावले

लग्नात खुर्चीवरून भांडण झाल्यामुळे लग्न रद्द

Marathi Matrimony

Maratha Matrimony

Maratha Soyrik

1 thought on “मराठा समाजाचा विवाह पध्दत बदलण्याचा परिवर्तनशील निर्णय”

Leave a Comment