विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च अनिष्ट प्रथा रद्द

मराठा सेवा संघाचे ठराव मंजूर

विवाह हे एक पवित्र बंधन असून, हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात.

मात्र सध्या विवाहाला भव्य सोहळ्याचे स्वरूप आले असून, अनाठायी खर्च, बडेजाव, गीत संगीताचा मारा व खाण्या-पिण्याची चंगळ आदी प्रकार वाढले असून, गरीब कुटुंबे बरबाद होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाने समाजाच्या विवाहातील अनिष्ट प्रथा रोखून आदर्श विवाहासाठी काही ठराव संमत केले.

धुळ्यातील हिरे भवन येथे वधू-वर परिचय मेळाव्यात समाजाने एकमुखाने ठराव मंजूर केले. वधू-वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांना राज्यातील शेकडो पालकांनी उपक्रमास पाठिंबा असल्याचे सांगितले. ठरावाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते जनजागृती करणार आहेत.

मराठा सेवा संघाने विवाहातील प्रीवेडिंग शूटिंग, मेंदी व संगीत कार्यक्रम, मूळ लावणे, आहेर देणे-घेणे, वैदिक विवाह आदी बंद, मोबाईलवर तोंडी निमंत्रण अथवा सोशल मीडियातून पत्रिका स्वीकारणे, वेळेवर लग्न लावणे, समाजस्वास्थ्यासाठी ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण व प्लॅस्टिक प्रदूषण नियमांचे पालन करणे, पंगतीत अन्नाची नासाडी थांबविणे, मोजके पदार्थ ठेवणे, अक्षता न फेकता लग्न लागताच टाळी वाजवून स्वागत करणे, अवाढव्य व अनाठायी खर्च कमी करणे, घटस्फोट होऊ नये म्हणून समुपदेशन कक्षाचा लाभ घेणे आदी ठराव मंजूर केले.

मराठा सेवा संघाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.